*आमदार जयश्री जाधव यांच्या निर्णयाचे शिवसेनेकडून स्वागत, शिवसेना जिल्हा कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी*
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात घोषित उमेदवार बदलण्यापासून स्वकीयांची नाराजी ओढावून घेण्याची नामुष्की कॉंग्रेस पक्षावर आली आहे. कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या निर्णयाचे कोल्हापुरातील शिवसैनिकांनी स्वागत केले असून, शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
सायंकाळी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ येथे जय भवानी जय शिवाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजेश क्षीरसागर आणि आमदार जयश्री जाधव यांच्या विजयाच्या घोषणा देत शिवसैनिकांनी जल्लोष केला.
यावेळी बोलताना शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख मंगल साळोखे यांनी, कॉंग्रेसने विद्यमान महिला आमदारांचे तिकीट कापून अपमान केला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयश्री ताईना शिवसेना कुटुंबात सामावून घेवून त्यांची उपनेत्या पदी नियुक्ती करून यथोचित सन्मान केला. ही राजेश क्षीरसागर यांच्या विजयाची नांदी असून, येणाऱ्या काळात राजेश क्षीरसागर आणि श्रीमती जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कोल्हापूरच्या विकासासाठी काम करेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, दीपक चव्हाण, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, मंगलताई कुलकर्णी, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, रिक्षा सेना शहरप्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे, प्रशांत नलवडे, अक्षय कुंभार, धैर्यशील जाधव, सुहास भालकर, अभिलाष चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.