*राजेश क्षीरसागर यांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन*
कोल्हापूर दि.१४ : गेली ३० वर्षे प्रलंबित असलेला रोजंदारी कर्मचाऱ्याना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मार्गी लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पहाटे ५ वाजता कर्मचाऱ्याना सेवेत कायम करण्याच्या निर्णयावर सही घेवून तो आदेश परवा स्वत: महापालिकेकडे सादर केला. याबाबत रोजंदारी कर्मचाऱ्यानी महानगरपालिकेत जल्लोष साजरा करीत आनंदोत्सव साजरा केला.
गेली ३० वर्षे रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणारे सिद्धार्थनगर येथील संजय काळे यांनी “जी आयुष्य भरासाठी नवीन भाकरी मिळाली ती तुमच्यामुळे आम्हाला मिळाली या भाकरीचे खरे मानकरी आपण आहात ती तुम्ही स्वत: आमच्यासोबत खायला या” अशी विनंती राजेश क्षीरसागर यांना केली. हे काम आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे काम असून, कर्मचाऱ्याना न्याय दिल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत राजेश क्षीरसागर यांनी हे आग्रहाचे आमंत्रण स्वीकारले. काल रात्री आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून राजेश क्षीरसागर रोजंदारी कर्मचारी संजय काळे यांच्या घरी गेले. यावेळी काळे कुटुंबियांच्या वतीने पुष्पवृष्टी करून क्षीरसागर यांचे स्वागत केले. क्षीरसागर यांनी कुटुंबातील जेष्ठ नागरिकांची आपुलकीने विचारपूस करून आशीर्वाद घेतला. यावेळी काळे कुटुंबियातील महिला भावूक होवून आपला आनंद व्यक्त केला. यानंतर राजेश क्षीरसागर यांनी संजय काळे व कुटुंबियांच्या सोबत स्नेहभोजनाचा आनंद लुटला. यावेळी रंगलेल्या गप्पा गोष्ठीमध्ये सिद्धार्थनगर मधील नागरिकांनी क्षीरसागर कुटुंबीयांनी महापूर आणि कोरोना कालावधीत केलेल्या मदतीचा विशेष उल्लेख करून क्षीरसागर यांचे आभार मानले. राजेश क्षीरसागर यांनीही गेल्या काही वर्षापूर्वी माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज निर्माण केला गेला. पण, हा गैरसमज नागरिकांनी मनातून काढावा असे आवाहन करत सिद्धार्थनगर मधील जुन्या आठवणीना उजाळा देत या भागातील नागरिकांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले.
यावेळी रोजंदारी कर्मचारी संजय काळे यांच्या कुटुंबियांसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, निलेश हंकारे आदी भागातील जेष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.