*कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी*
*शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे आज भूमिपूजन*
*वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती*
*३० एकरांत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये होणार ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल*
*पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय*
*माझ्या जिल्ह्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची बाब….*
*कोल्हापूर, दि. ८:*
कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांच्या विस्तीर्ण जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १,१०० बेडच्या हॉस्पिटलचे भूमिपूजन आज बुधवार दि. ९ होत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सायंकाळी पाच वाजता शेंडा पार्कमध्ये भूमिपूजन आणि साडेपाच वाजता तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचेही, श्री. मंत्री यांनी सांगितले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत आरोग्य संकुल होत आहे. या अद्ययावत आरोग्य संकुलात ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल होणार आहे.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण ३० एकर जागा राखीव ठेवलेली आहे. ही जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. लवकरच एकूण अकराशे बेडच्या सर्व सुविधायुक्त व अत्याधुनिक अशा या महाविद्यालयाच्या हॉस्पिटलचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभागासाठी ६०० बेड आहेत, २५० बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अशी विभागणी आहे.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शव विच्छेदन गृह, मुलींचे वस्तीगृह या पूर्ण झालेल्या पाच इमारतींचे लोकार्पण होणार आहे. तसेच पुढील इमारतींचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.
*असे होणार आरोग्य संकुल……*
□एकूण ३० एकरांत साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी……
□ सामान्य रुग्णालय व बाह्यरुग्ण विभाग बेड ६००
□ कॅन्सर हॉस्पिटल बेड २५०
□ सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल बेड २५०
□न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत
□निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरूष वस्तीगृह- क्षमता २५०
□निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता महिला वस्तीगृह- क्षमता २५०
□मुलींचे वस्तीगृह- क्षमता १५०
□मुलांचे वस्तीगृह- क्षमता १५०
□परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता १००
□ सेंट्रल लायब्ररी
□ परीक्षा भवन- क्षमता ४००
□अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण
*सर्वोच्च समाधान……!*
*पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, माझा स्वतःचा जिल्हा असलेल्या कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे याचा मला आनंद, अभिमान आणि समाधान आहे. रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय. या वैद्यकीय नगरीतील १,१०० बेडचे हे अत्याधुनिक आरोग्यसंकुल ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची बाब. या आरोग्य संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा तर मिळतीलच. परंतु; पुणे -मुंबईसारख्या मोठ्या शहरात होणारे यकृत प्रत्यारोपण, मेंदूच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, कॅन्सर, किडनी, हृदय पोटाचे गंभीर विकार, सांधे रोपण इत्यादी विशेष उपचारही कोल्हापुरातच मिळतील.*
…………..