Spread the news

कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

– जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

 

* महाराष्ट्राची शक्तिपीठे व गौरव माय मराठीचा या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

* पारंपरिक वेशभूषा दिवस व नवदुर्गा बाईक रॅली

* युद्धकलांचे प्रात्यक्षिक, विविध बँड पथकांचे सादरीकरण

* भव्य शाही स्वारीच्या माध्यमातून साजरा होणार शाही दसरा

 

कोल्हापूर, दि. 1 

:कोल्हापूरच्या दसऱ्याला ऐतिहासिक महत्व आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दसऱ्यादिवशी ऐतिहासिक पद्धतीने सीमोल्लंघन होणार असून या शाही दसऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर ते शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 या दरम्यान विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दसरा महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, माहिती अधिकारी वृषाली पाटील तसेच माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

 

  दसरा महोत्सवामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा थोडक्यात पुढीलप्रमाणे-

 

गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी भवानी मंडप परिसर येथे सायंकाळी 5 वाजता दसरा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच मेन राजाराम हायस्कूल, भवानी मंडप येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ताक्षरीत दुर्मिळ पत्रसंग्रहाच्या प्रदर्शनाचे व ऐतिहासिक ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

 

शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्ह्यातील नागरिक, तसेच शाळा, महाविद्यालये व शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागातून पांरपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पारंपरिक पध्दतीने फेटा बांधण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.

 

शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 

रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता भवानी मंडप परिसरात “महाराष्ट्राची शक्तीपीठे” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी भवानी मंडप परिसर येथे 10 पथकांचे युध्दकला प्रात्यक्षिक सादरीकरण. त्याचबरोबर भवानी मंडप परिसरात सायंकाळी 5 वाजता “गौरव माय मराठीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता विविध क्षेत्रातील महिलांच्या सहभागातून “नवदुर्गा बाईक रॅली’ चे आयोजन केले आहे.

ही रॅली दसरा चौक-बिंदू चौक- शिवाजी पुतळा-भवानी मंडप-टेंबलाई मंदिर-कावळा नाका-दसरा चौक या मार्गावरुन निघेल.

 

बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता भवानी मंडप परिसर येथे पोलीस कर्मचारी बॅड, मिलीटरी कर्मचारी बँड, शाळांचे व इतर नामवंत पथकांचे बँड वादन आयोजित केले आहे.

 

गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती व सण परंपरा या विषयावर आधारीत निबंध स्पर्धा होणार आहे.

 

शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी श्री अंबाबाई देवीच्या नगरप्रदक्षिणा मार्गावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले असून यामध्ये उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.

 

शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर दसऱ्यानिमित्त शाही स्वारीचे आयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोलवादन पथके, लेझीम पथके, झांज पथक, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे, मर्दानी खेळाची पथके, मल्लखांब पथके, 11 घोड्यांसमवेत 11 मावळे, 10 मावळे-अब्दागिरीसह यांचा समावेश असणार आहे.

 

तसेच न्यू पॅलेस ते दसरा चौक या मार्गावरुन 150 बुलेटस्वार, पोलीस एस्कॉर्ट व छत्रपतींच्या घराण्यातील वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली दरम्यान एन एस एस, एनसीसी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी या स्वारीला मानवंदना देतील.

याशिवाय जिल्हा परिषदेच्या वतीने व शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य कार्यक्रमांचे नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

****

https://www.facebook.com/diokolhapur

https://twitter.com/dgiprkolhapur


Spread the news

You may also like

error: Content is protected !!