संकटकाळी गरज असताना लाचार होऊन दुसऱ्याच्या दारात जाणाऱ्या नेत्याला जागा दाखवा
शरद पवार यांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
निकृष्ट काम करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या हातात पुन्हा सत्ता देऊ नका
,कोल्हापूर
शेतकरी, कष्टकरी तरुणांना उध्वस्त करणारे केंद्र सरकारचे धोरण आहे, राज्यात भगिनींचा सन्मान नव्हे तर अत्याचार सुरू आहे. त्यामुळे अशा नेत्यांच्या हातात सत्ता देऊ नका असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
कागल येथे झालेल्या भव्य मेळाव्यात समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका करताना संकटकाळी साथ देण्याची जबाबदारी असताना लाचार होऊन दुसऱ्यांच्या दारात जाऊन बसलेल्या या नेत्याला जागा दाखवा असा टोला मारला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भ्रष्टाचारी महायुती सरकारला पुन्हा सत्ता देऊ नका असे आवाहन केले.
पवार यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शेतकरी हिताची जपणूक करण्याची जबाबदारी केंद्राची असताना त्यांना उध्वस्त करण्याचे काम हे सरकार करत आहे. यामुळे शेतकरी, कष्टकरी, तरुण संकटात आला आहे. पवार म्हणाले, सहा महिन्यापूर्वी बसवलेला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्याचे काम निकृष्ट असल्यामुळेच तो पुतळा कोसळलेला आहे. असं निकृष्ट काम करणाऱ्या लोकांच्या हातात पुन्हा महाराष्ट्र देऊ नका.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, 25 वर्षात यांना सत्ता दिली. सर्व काही दिलं. पण, माझ्यावर प्रसंग आल्यानंतर संकटात साथ देण्याची जबाबदारी असताना ते लाचार होऊन दुसऱ्याच्या दरवाजासमोर बसले. अशा लाचारांना जनता स्वीकारणार नाही असे सांगतानाच कागलच्या जनतेने यांना धडा शिकवावा असे आवाहनही त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या धर्मांध व्यक्तींच्या, सत्तेच्या मांडीला मांडी लावून जे बसले आहेत त्यांना धडा शिकवायचा आहे. गुजरातला घाबरून इतिहास बदलण्याचे पाप, कटकारस्थान राज्यात सुरू आहे. ती खपवून घेतली जाणार नाही.
समरजीत घाटगे म्हणाले, शरद पवार हे वस्तादांचे वस्ताद आहेत. कागल मध्ये त्यांनी परिवर्तन आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. कागलच्या जनतेने तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला संधी द्यावी.
प्रारंभी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उत्तम जानकर, शिवानंद माळी यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. मेळाव्यास आर. के. पोवार, सुवासिनीदेवी घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, नवोदिता घाटगे, नंदाताई बाभुळकर, रणजितसिंह पाटील, रामराजे कुपेकर, काकासाहेब पाटील, ए. वाय. पाटील, रोहित पाटील, पद्मजा तिवले, अनिल घाटगे, अश्विनी मांगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.