प्राचार्य क्रांतीकुमार पाटील यांची सुकाणू समितीवर निवड
कोल्हापूर : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शनकरिता राज्य सरकारने सुकाणू समितीची स्थापना केली आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित या समितीची स्थापना झाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर हे सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य पाटील यांचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव, विविध पदावर काम करताना उमटविलेला ठसा, प्रशासकीय, शैक्षणिक संस्थात्मक काम आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील कामाचा आवाका याची दखल घेत त्यांची सुकाणू समितीवर निवड केली आहे. प्राचार्य पाटील हे ताराराणी विद्यापीठाचे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. कमला कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावरील कामाचा आवाका आहे. प्राचार्य संघटनेच्या कामात आघाडीवर आहेत.
राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्थापलेल्या या समितीत एकूण २० सदस्य आहेत. यापूर्वी या समितीवर सदस्य म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांचा समावेश आहे. आता प्राचार्य पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापुरातील आणखी एका अनुभवी व्यक्तिमत्वाची या समितीवर निवड झाली.