गोकुळच्या नफ्यात घट, ठेवी मोडल्या
शौमिका महाडिक यांचा आरोप
कोल्हापूर : गोकुळच्या नफ्यात, दूध विक्रीत घट झाली. सत्ताधारी मंडळीनी ८७ कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या. दूध संकलन वाढले नाही, फक्त खर्चच वाढत आहे असा आरोप विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केला.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची सर्वसाधारण सभा 30 ऑगस्ट रोजी होत आहे या सभेच्या पूर्वसंध्याला महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभारावर टीका केली. त्या म्हणाल्या, गोकुळमध्ये सत्ताधारी मंडळींचा कारभार म्हणजे खाजगीकरणाचा प्रकार आहे. नवीन पशुवैद्यकीय कॉलेज सुरू करणे व पन्नास लिटर दूध घालण्याची अट रद्द करण्याचा निर्णय हा खाजगीकरणाचाच प्रकार आहे.
महाडिक म्ह्णाल्या, सध्याच्या सत्ताधारी मंडळींच्या कालावधीत गेल्या वर्षापेक्षा यंदा गोकुळची कामगिरी आणखी खालावली आहे. मुंबई, पुणे येथे गोकुळच्या म्हैस दुधाला मोठी मागणी असते. मात्र उपलब्ध आकडेवारीनुसार वार्षिक दीड कोटी लिटर इतकी दूध विक्रीत घट झाली आहे. मार्कैटिंग व्यवस्थित होत नाही. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची विक्री म्ह्णावी तेवढी होत नाही. पशूखाद्य प्रकल्पही तोट्यात आहे.