55
न्याय संकुलाच्या जागेचा अडथळा दूर
खा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश
इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इचलकरंजी न्यायसंकुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्तावित जागेवरील आरक्षण उठविण्याचा निर्णय घेऊन सदरची जागा न्याय संकुलासाठी देण्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. यासाठी खा.धैर्यशील माने आणि इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांना सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.
कोल्हापूरनंतर इचलकरंजी शहर विस्ताराने मोठे आहे. येथे खटल्यांची संख्याही अधिक आहे. मात्र न्यायालयासाठी आवश्यक इमारत उपलब्ध नसल्याने न्यायाधिशांची संख्याही कमी होती. परिणामी प्रलंबित खटल्यांचे प्रमाण वाढत राहिले होते. त्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. ही बाब लक्षात घेऊन न्याय व्यवस्थेचे काम गतीने होण्यासाठी न्याय संकुलाची मागणी पुढे आली. त्यासाठी बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी प्रयत्न सुरु केले होते. महापालिकेचा भुखंड क्रमांक 9683/84/85, 9709, 9708, 9697 वरील साडेचार एकर जागेची मागणी केली होती. मात्र या जागेवर भाजी मार्केट, फुड कॉम्प्लेक्स, एज्युकेशन कॉम्प्लेक्स, शॉपिंग सेंटरसारखे आरक्षण असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. ही आरक्षणे रद्द करण्यासाठी बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने, बापु मुसळे यांच्या माध्यमातून खा.धैर्यशील माने यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या होत्या. यावेळी तातडीने धैर्यशील माने यांनी नियोजीत न्याय संकुलासंदर्भात बैठक घेण्याची मागणी केली.
यावरुन मुंबई येथे नगरविकासचे मुख्य सचिव असीम गुप्ता, विशेष कार्यकारी अधिकारी सतिश गीते यांच्या कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. या बैठकीला सहसचिव डॉ.प्रतिभा भदाने, महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नगररचनाकार भोसले, नितीन देसाई, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.शिवराज चुडमुंगे, माजी उपाध्यक्ष विवेक तांबे, विशाल जाधव आणि न्याय संकुल समिती सदस्य अल्ताफ हुसेन मुजावर, रविंद्र माने, बापु मुसळे उपस्थित होते. यानंतर हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय संकुलाच्या प्रस्तावाला तत्वता मंजूरी दिली होती. रविवारी या संदर्भात झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत शिक्का मोर्तब झाला. संबंधीत जागेवरील आरक्षण उठवून जागा न्याय संकुलाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे इचलकरंजीत लवकरच न्याय संकुलासाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही खा.धैर्यशील माने यांनी दिली आहे.