राधानगरीचे उघडले चार दरवाजे
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर वाढला आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अठरा दिवसाच्या विश्रांती नंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. हा पाऊस पीकांना पुरक असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
वीस दिवसापूर्वी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात तुफान पाऊस झाला. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली. अनेक गावात पुराचे पाणी शिरले. पीके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले. त्यानंतर मात्र पाऊस थांबला. दोन दिवसापासून पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणे पूर्ण भरली आहेत. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे सकाळी उघडले. त्यामुळे भोगावती नदीत सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेली आहे.