लाडकी बहीणच नव्हे, तर कोणतीच योजना कधीच बंद करणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजारो महिलांच्या उपस्थितीत दिला शब्द, कोल्हापुरात झाला वचनपूर्ती सोहळा
कोल्हापूर
सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी लाडकी बहिणसह लाडका भाऊ व अनेक योजना सुरू केल्या आहेत, या योजनांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे, यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळेच त्यांनी या सर्व योजना केवळ निवडणुकीपुरत्याच असल्याचे सांगत बदनामी सुरू केली आहे, पण तुमचा भाऊ म्ह्णून सांगतो, सरकारच्या कोणत्याच योजना बंद करणार नाही, उलट त्याची रक्कम वाढविली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही अशा योजनांना पैसा कमी पडू देणार नाही असा शब्द दिला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा गुरूवारी कोल्हापुरात पार पडला. जिल्ह्याच्या विविध भागातून पन्नास हजारावर महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा करतानाच विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. तपोवन मैदानावर हा सोहळा झाला. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे लेझीम पथक, फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले. अनेक महिलांनी त्यांना राखी बांधली. या कार्यक्रमास पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना बंद करण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. न्यायालयात गेले. कारण, या योजनांमुळे त्यांच्या पोटात गोळा आला आहे. पायाखालची जमीन घसरली आहे. खोटं नॅरेटिव्ह तयार करून एकदाच फसवता येते, त्यामुळे आता जनता फसणार नाही याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच या सावत्र भावांनी बदनामीचा डाव रचला आहे.
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आणि पैशाच्या गादीवर लोळणाऱ्यांना दीड हजाराचे मोल कळणार नाही असा टोला मारताना ते म्हणाले, अशा लोकांना बाजूला काढा, तुमच्या जीवनाचे आम्ही सोनं करू.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दिलेले पैसे परत काढून घेतील अशा थापा मारत विरोधक भीती घालत आहेत. पण, एक पैसा तुमच्या खात्यावरून कुणीही काढून घेणार नाही. हे काम करणारं, विकास करणारं सरकार आहे, वेळकाढूपणा करणारं नाही. पडेल ती किंमत मोजू, पण, सर्व योजना सुरू ठेऊ.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्ह्णाले, तुमचे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरी ही योजना बंद होणार नाही. कारण हे संवेदनशील सरकार आहे. कुणुीही कितीही टीका केली, तरी हे सरकार तुमचं आहे. तुमच्या हितासाठीच ते सत्तेवर आहे. आम्ही पळून जाणारे नाही, लढणारे आहोत.
प्रारंभी पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उद्योगमंत्री सामंत, खासदार माने, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष् राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश पाटील, गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, रवींद्र माने, महेश जाधव, सत्यजीत कदम, राहूल चिकोडे, विजय जाधव, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अदिल फरास, सुजित चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.