*कोल्हापुरातील नाट्य प्रयोग अखंडित सुरु राहण्यासाठी पर्यायी सभागृह उपलब्ध करा : राजेश क्षीरसागर यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना*
कोल्हापूर दि.१४ : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरच्या कला क्षेत्राचे नुकसान झाले. नाट्यगृहाची वास्तू जशीच्या तशी उभी राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ घटनास्थळी भेट देवून कलाकारांना दिलासा दिला. नाट्यगृह पुढील काळात दिमाखात उभे राहील यात शंका नाही. पण, तोपर्यंत वर्षभर होणाऱ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य प्रयोगात खंड पडू नये यामुळे कलाकारांचे व अवलंबून व्यावसायिकांची आर्थिक हानी होवू नये. याकरिता पर्यायी सभागृह तात्काळ उपलब्ध करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. याबाबत राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना लेखी पत्राद्वारे दिल्या आहे.
यामध्ये पुढे म्हंटले आहे कि, कलापूरची रंगभूमी आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे एक अतूट समीकरण आहे. रंगभूमीच्या एकूणच प्रवासाचं हे नाट्यगृह प्रमुख साक्षीदार असून, इथला प्रत्येक रंगकर्मी जगाच्या रंगभूमीवर गाजला. कोल्हापूरची अस्मिता असलेले हे नाट्यगृह आगीत बेचिराख झाले. या नाट्यगृहाबाबतीत कोल्हापूरवासीयांच्या जोडलेल्या भावनांचा सहानुभूतीने विचार करून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी घटनास्थळी भेट देवून रु.२० कोटींचा निधी जाहीर केला. त्यानुसार नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीचा कालावधी पाहता नाट्य प्रयोगामध्ये खंड पडून कलाकार व यावर अवलंबून इतर व्यावसायिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर शहरात नाट्य प्रयोगासाठी वापरण्यात येणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे एकमेव नाट्यगृह आहे. परंतु, दुदैवी घटनेत तेही बेचिराख झाल्याने येथील कलाकार व नाट्यप्रयोगांवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिक व कामगारांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत दरवर्षी संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा, हौशी मराठी नाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण मंडळ प्राथमिक नाट्य महोत्सव या राज्यस्तरीय स्पर्धांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येते. परंतु, सदर दुर्घटनेमुळे सदर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात खंड पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कलाकार, निगडीत व्यावसायिक यांचे उदरनिर्वाह यावर अवलंबून असल्याने सदर स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम सुरळीत सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापूरचे नाट्य प्रयोग, कला, सांस्कृतिक कार्यक्रम अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी पर्यायी सभागृह उपलब्ध ठेवण्याची सूचना राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.