संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधनीस सरकार सक्षम : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर दि.११ : कलापूरची रंगभूमी आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे एक अतूट समीकरण आहे. रंगभूमीच्या एकूणच प्रवासाचं हे नाट्यगृह प्रमुख साक्षीदार असून, इथला प्रत्येक रंगकर्मी जगाच्या रंगभूमीवर गाजला. कोल्हापूरची अस्मिता असलेले हे नाट्यगृह आगीत बेचिराख होताना मनाला अत्यंत वेदना झाल्या. घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. त्यानुसार कलाकारांच्या आणि जनभावनांचा आदर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घटनास्थळी भेट देवून र.रु.२० कोटींचा निधी जाहीर केला आहे. लवकरच हा निधी वितरीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नाट्यगृह पुन्हा आहे त्याच रुपात उभारले जावे, अशी प्रत्येक कोल्हापूरवासीयांची इच्छा असून, कलाकारांना विश्वासात घेवून, सर्वांचा सहभाग ठेवून या वास्तूचा आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
क्षीरसागर यांनी सांगितले की, घडलेल्या घटनेदिवशी तात्काळ घटनास्थळी आम्ही पोहचलो. जिल्हाप्रशासनाशी तात्काक संपर्क साधून अग्निशम बंब, टर्न टेबल लॅडर सह विमानतळ प्रशासनाचे बंब देखील तात्काळ उपलब्ध केले गेले. पण, लाकडी बांधकामामुळे कमी कालावधीत जास्त नुकसान झाले. घटनेची माहिती तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यासह कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी आलेला रु.१० कोटींचा निधी तात्काळ या नाट्यगृहाच्या कामास जाहीर केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नाट्यगृह परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना ७ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या दरम्यान ५ ते ७ वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला व याठिकाणी भेट देण्याची विनंती केली. यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीची बैठक स्थगित करून नाट्यगृहाला भेट देवून र.रु.२० कोटींचा निधी जाहीर केला. नाट्यगृहाच्या पाहणी नंतर उपस्थित कलाकारांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतल्या.
दुर्घटनेत रमेश सुतार, सुनील घोरपडे, मिलिंद अष्टेकर यांचे नाटकाच्या पुढील प्रयोगासाठी ठेवलेले लाखो रुपयांचे साहित्य मातीमोल झाल्याचे सांगितले. यावर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रु.५ लाखांची मदत नुकसानग्रस्तांना दिली. यासह आपल्यामार्फतही रु.५ लाखांची मदत देवू केली आहे. या नाट्यगृहाच्या पुन: उभारणीसाठी दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, संघटना यांनी जाहीर केलेल्या मदतीसाठी जाहीर आभार.. झालेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले असून, यामध्ये दोषी आढळल्यास त्यावर शासन तात्काळ कायदेशीर कारवाई करणार आहे. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाप्रमाणेच कोल्हापुरातील इतर ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून, आगामी काळात अशा पुरातन ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना राज्य सरकार मार्फत केल्या जातील असेही त्यांनी सांगितले.