*केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 50 कोटीचा निधी द्या*
इंडिया आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर
संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने नागरी सुविधा योजनेमधून 50 कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी इंडिया आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आणि इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षांच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करवीर नगरीचे भूषण असलेल्या कोल्हापूर येथील संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला व ऐतिहासिक खासबाग मैदानाच्या काही भागाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. यामध्ये नाट्यगृहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी 1915 रोजी उभारलेले केशवराव भोसले नाट्यगृह हे भारतातील बॉम्बे थिएटर सारख्या मोठ्या नाट्यगृहानंतरचे एकमेव मोठे नाट्यगृह म्हणून देशात परिचित आहे. हे नाट्यगृह कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आहे. युरोपियन पद्धतीने या नाट्यगृहाची उभारणी केली होती.त्यामुळे येथील रंगमंच, प्रेक्षक बैठक व्यवस्था , आवाज नाट्यगृहाच्या सर्व भागात पोहोचवण्याची व्यवस्था हे वैशिष्ट्यपूर्ण होते. कोल्हापूरकर आणि कलाकारांच्या साठी हा हृदयात जपून ठेवलेला ठेवा होता . त्यामुळे अशा प्रकारची वास्तू पुन्हा उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या नागरी सुविधा योजनेमधून 50 कोटीचा निधी मंजूर करुन सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.