Spread the news

संजय घाटगे यांचा पालकमंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा

 

कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे संभाव्य उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, महायुतीतील आमदार प्रकाश आवाडे, समरजित घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल देसाई व शिवाजी पाटील, संग्राम कुपेकर यांनी भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्याने या पक्षालाच रामराम करण्याच्या तयारीत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कागल विधानसभा मतदार संघातून पालकमंत्री मुश्रीफ यांची महायुतीच्या वतीने उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने तयारी करणाऱ्या घाटगे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे नाहीत. यामुळे त्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश करण्यासाठी संपर्क सुरू ठेवला आहे. दोन वेळा याबाबत वरिष्ठांशी चर्चा झाल्याचे समजते. पाच वर्षानंतरही पक्षात प्रवेश न दिल्याने नाराज असलेले आमदार आवाडे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा वेगावली आहे. याशिवाय भाजपची उमेदवारी मिळण्याची चिन्हे कमी झाल्याने शिवाजी पाटील, संग्राम कुपेकर,राहूल देसाई यांच्यासह काहीजण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

दुसरीकडे महाविकास आघाडीतही राजकीय हालचाली वाढल्या आहेत. कागल विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाटा गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. येथून ते अथवा त्यांचे पूत्र अमरिष लढण्यासाठी इच्छूक असताना अचानक त्यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयाची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली असून त्यांच्यावरील कारवाईबाबत वरिष्ठच निर्णय घेतील असे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!