शनिवारी वाहने विना टोल सोडणार
काँग्रेस करणार आंदोलन
कोल्हापूर
पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असतानाही त्यासाठी जी टोल वसुली सुरू आहे, ती बंद करावी अशी मागणी काँग्रेसने केली असून यासाठी शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी या महामार्गावरील चार टोल नाक्यावर वाहने मोफत सोडण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, आमदार सतेज पाटील, आमदार संजय जगताप, आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, पुणे ते कोल्हापूर महामार्गाची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्त्याची एवढी बिकट अवस्था असताना टोल का द्यायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत हा रस्ता दुरुस्त होत नाही, तोपर्यंत टोल देणार नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यासाठीच शनिवारी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महामार्ग अतिशय खराब झाल्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्ता चांगला होत नाही तोपर्यंत टोल देणार नाही.
शनिवारी सकाळी कोल्हापूर, सातारा आणि पुणे या तीन जिल्ह्यातील किणी, आनेवाडी, तासवडे व खेड शिवापुर या चार टोल नाक्यावर हे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता हे आंदोलन सुरू होणार असून एक तास सर्व वाहने विना टोल सोडण्यात येणार आहेत. यानंतरही सरकारने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.