*कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी*
कोल्हापूर
खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत रेल्वेशी संबंधित मुद्दे उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग सुरू होणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल. दिर्घकाळ रेंगाळलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी निधीची तरतुद करावी. तसेच कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला वेग यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.
खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना उद्देशून निवेदन केले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवताना, कोल्हापूरशी निगडीत प्रलंबित मुद्दयांना त्यांनी हात घातला. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर आहे, मात्र त्याला गती मिळालेली नाही. व्यापार, कृषी, उद्योग आणि पर्यटनाच्या विकासासाठी, कोल्हापूर कोकणला जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी निधीची तरतुद करून, तातडीने कोल्हापूर- वैभववाडी रेल्वेमार्ग अस्तित्वात यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. तसेच कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करणे गरजेचे आहे. त्यातून कोल्हापूरला येणार्या आणि जाणार्या रेल्वे गाडयांची संख्या वाढेल, परिणामी रोजगार आणि उद्योग वाढेल, सुरक्षित आणि गतीमान प्रवास होईल. त्यामुळे कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला तातडीने भरीव निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली.