विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची चळवळ हाती घ्यावी                                                                                              – मा. सयाजी शिंदे, प्रसिद्ध सिनेअभिनेते विवेकानंद कॉलेजमध्ये नवीन विद्याशाखा एम. बी. ए. आणि एम. सी. ए. चे उदघाटन संपन्न

Spread the news

विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची चळवळ हाती घ्यावी

                                                                                             – मा. सयाजी शिंदे, प्रसिद्ध सिनेअभिनेते

विवेकानंद कॉलेजमध्ये नवीन विद्याशाखा एम. बी. ए. आणि एम. सी. ए. चे उदघाटन संपन्न

कोल्हापूर दि. ३० : आजकाल विकासाच्या नावाखाली हजारो झाडे कापली जात आहेत, एकही जंगल सुरक्षित राहिलेले नाही. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाखो विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची चळवळ हाती घ्यावी. झाड, फुल, फळ, पान यामध्ये मला माझी आई दिसते. झाड कधीही भेदभाव करीत नाही. बालपणापासूनच मला झाडाचा आशीर्वाद मिळालेला आहे. झाड मुलांच्या मनात लावले पाहिजे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. महाविद्यालयातील ग्रंथ आणि शिक्षक यांच्यामुळे अभिनयाची ओढ मला लागली. संस्थेचे आराध्यदैवत स्वामी विवेकानंद हे एक व्यक्ती नसून एक विचार आहेत. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची शिकवण विद्यार्थ्यांनी अवलंबावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. ते विवेकानंद कॉलेजमधील नवीन विद्याशाखा एम. बी. ए. आणि एम. सी. ए. च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सकारात्मकता, कष्ट, चांगले मित्र, साधी राहणी, उच्च विचारसरणी, आनंदी जीवन याविषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.

            अध्यक्षीय मनोगतात मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूकीस आळा, श्रम आणि स्वावलंबन या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजाव्यात, यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि रोजगारभिमुख बनविण्यासाठी एम. बी. ए. आणि एम. सी. ए. अशा अभ्यासक्रमांची आवश्यकता असून या अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन केले.

            याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांनी आजच्या काळात रोजगाराच्या संधी कमी होत असताना रोजगार देणारे उद्योजक निर्माण करण्यासाठी एम. बी. ए. आणि एम. सी. ए हे अभ्यासक्रम सुरु करीत असल्याचे सांगितले.

            यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मा. प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे यांनी आपण स्वत: वृक्षप्रेमी असून वृक्षांकडून सकारात्मकता घ्यायला हवी, झाडांवर प्रेम करावे, त्यांना दुखावू नये, प्रसंगी त्यांची क्षमा मागावी, असे मत व्यक्त केले. यावेळी सिनेकलावंत सुजित शेख यांनी आपले मनोगत मांडले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुणे मा. सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी ऋषी डोंगरे आणि प्रा. सतीश उपळावीकर यांनी रेखाटलेली रेखाचित्रे मा. सयाजी शिंदे याना भेट म्हणून दिली. यावेळी सदर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी कष्ट घेतलेल्या प्राचार्य विरेन भिर्डी, आर. के. पाटील, विराज जाधव, अमित आव्हाड, विजय पुजारी, अश्विनी चौगुले, सर्जेराव खोत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्थाप्रार्थनेने झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले. पाहुण्यांची ओळख संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी करून दिली. आभार एम. बी. ए. चे विभागप्रमुख प्रा. विराज जाधव  यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. समीक्षा फराकटे, प्रा. अशोक पाटील यांनी केले. कार्यक्रमास कोल्हापूर विभागप्रमुख मा. श्रीराम साळुंखे, प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, संस्था संकुलातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!