शेतकऱ्यांचे कैवारी स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे

Spread the news

 

शेतकऱ्यांचे कैवारी  स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे

 

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज,सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व, जाणते नेतृत्व,कागलच्या श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,सहकारमहर्षी,सहकार,कला,क्रीडा,कृषि,सांस्कृतिक आदी बहूविध क्षेत्रातील अजातशत्रू व्यक्तिमत्व,ज्येष्ठ विचारवंत, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणजे स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे होत.त्यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त..

 

आरक्षणाचे जनक,बहूजन समाजाचे उद्धारक,लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतीशताब्दी वर्ष व शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती नुकतीच विविध उपक्रमांनी साजरी झाली.त्यांच्या जनक घराण्याचे वंशज असलेल्या स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आपली उभी हयात राजर्षींचाआदर्श विचार डोळ्यासमोर ठेवूनच शेतकरी, कष्टकरी,दीनदलित, बहुजन रयतेच्या उद्धार आणि जनसेवेचा वसा आणि वारसा आयुष्यभर जपला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या केवळ रक्ताचेच नव्हे तर आचार, विचार,कतृत्व आणि संस्कारांचेही वारसदार असल्याचे स्व.घाटगे यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखविले .राजर्षींचे कार्य आभाळाएवढे मोठे आहे. त्यांचे वारस या नात्याने त्यांचा तुलनेत काही प्रमाणात जरी समाजकार्य आपल्या हातून झाले तर आपल्या आयुष्याचे सार्थक होईल.या उदात्त भावनेने त्यांच्याच नावाने श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची त्यांनी स्थापना केली. हाच कारखाना देशातील सहकारी साखर कारखानदारीला दिशादर्शक व दीपस्तंभ ठरला आहे.

शाहू महाराजांच्या नावाच्या कोल्हापूरमधील शाहू मिलसह इतर संस्था धडाधड कोसळत असताना त्यांच्या नावाच्या कारखान्याने मात्र वेगळीच उंची गाठली. राजर्षींचे जिवंत स्मारक म्हणून स्व. घाटगे यांनी या कारखान्याचा नावलौकिक वाढविला. त्यांच्या स्वच्छ, पारदर्शी नेतृत्वामुळे शाहू साखर कारखाना सर्वोच्चस्थानी पोचला.या कारखान्यास त्यांच्या कारकिर्दीत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ५५ तर आजअखेर ७०पुरस्कार मिळाले आहेत .

शाहू ग्रुपमधील मोजक्याच सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल उभे केले आहे.या वटवृक्षाचा लाभ पुढच्या पिढ्यांनाही होत आहे.याचे सर्व श्रेय त्यांनी सभासद,शेतकरी,कर्मचारी यांनाच दिले. कारखान्याचे सभासद शेतकरी हेच त्यांचे खरे मालक असून संचालक मंडळ व चेअरमन फक्त विश्वस्त व राखणदार आहेत.अशा पवित्र भावनेने चालविला.

कागल तालुक्याचे आमदार म्हणून दोनवेळा प्रतिनिधित्व करताना त्यांनी कागल तालुक्यातील रस्ते,पूल,वीज, शिक्षण,महिला सबलीकरण औद्योगीकरणासाठी ठोस कृतिशील उपायोजना केल्या.
शाहू साखर कारखान्यात केवळ ऊस गाळप करणे, साखर तयार करणे यावर अवलंबून न राहता उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्पही त्यांनी यशस्वीपणे उभारले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्ती कलेला राजाश्रय दिला होता. मात्र त्यांच्यानंतर मरगळ आलेल्या कुस्ती कलेला चालना देण्यासाठी शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून शाहू जयंतीच्या निमित्ताने स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी आॕलम्पिकच्या धर्तीवर मॅटवरील कुस्ती स्पर्धा सुरू केल्या.खेळाडूंना शिष्यवृत्तीचे वाटप केले. तालमी, व्यायामशाळा व कुस्ती मैदानांना आर्थिक पाठबळ देऊन राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत सुवर्ण वैभव पाहिलेल्या कुस्ती कलेला चालना दिली.शाहू साखर कारखान्याचे अनेक मानधनधारक खेळाडू केवळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा चमकत आहेत.

शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन स्वतंत्र आर्थिक तरतूद केली होती. त्याप्रमाणेच शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे. यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्तीची योजना सुरू केली. श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर या शिक्षण संकुलाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमाणे त्यांनी शेती व सहकारी साखर कारखानदारीतील प्रगत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. यासाठी ब्राझीलचा दौरा केला.त्याचा फायदा शाहू कारखान्यासह शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाच्या रूपाने झाला.पूर्वीची कागल बँक व आत्ताच्या राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचा विस्तार स्व. घाटगे यांच्यामुळे झाला. त्यामुळे सर्वसामान्यांसह बहूजनांना ही बँक “आपली बँक” वाटते. शिवाय शेतकऱ्यांना दर्जेदार खते,औजारे व इतर निविष्ठा रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी स्थापन केलेली शाहू कृषी खरेदी विक्री सोसायटी हेसुद्धा त्यांच्या शेतकरी हिताच्या विचारांचे प्रतीकच मानले पाहिजे.

कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना ताळेबंद समजावा म्हणून त्यांनी स्वतंत्र अभ्यासवर्ग घेतले होते.सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा म्हणजे तर हाणामारी, साहित्यांची फेकाफेक, आरोप -प्रत्यारोप हे चित्र पहावयास मिळते. मात्र शाहू ग्रुपमधील सर्वच संस्था याला अपवाद ठरल्या आहेत. शाहू साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे संचालक मंडळ व सभासद यांचा एक स्नेहमेळावा असे आनंददायी चित्र पहावयास मिळते. एका सभेत तर सभासद शेतकऱ्यांनी स्व. राजेंच्या निरपेक्ष कार्याबद्दल शेतकऱ्यांच्या उसातून ठराविक रक्कम कपात करून घेऊन त्यांना आलिशान गाडी भेट देण्याचा प्रस्ताव मांडला होता.मात्र त्यांनी त्यास अतिशय विनम्रपणे नकार दिला. आपल्याला जर पैसे द्यायचे असतील तर कागलमधील श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी द्या.असे आवाहन केले. त्यांचा हा शब्द तमाम शेतकरी-कष्टकरी यांनी खाली पडू न देता कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. आणि स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली केवळ कागलच्या नव्हे तर संबंध कोल्हापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे दिल्लीच्या अक्षरधाम मदिंराच्या धर्तीवर देखणे श्रीराम मंदिर दिमाखात साकारले आहे.भाग विकास निधीतून शेकडो मंदिरांना आर्थिक मदत केली.

सभासद शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व काही सूचना करावयाच्या असतील तर ते नियमितपणे दर मंगळवार व शुक्रवारी कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा माळबंगला येथील दरबार हॉलमध्ये भेटीगाठी घेत असत.त्यापुढे जाऊन त्यांना कागलपर्यंत सुद्धा येण्याचे कष्ट पडू नयेत.यासाठी गावोगावी ऊस विकास परिसंवादाच्या निमित्ताने त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यातून आलेल्या सूचनांची दखल घेऊन त्याप्रमाणे कामकाजात सुधारणाही केल्या .शाहू ग्रुपमधील सर्वच संस्थांच्या निवडणुकांचा अपवाद वगळता बिनविरोध करण्याचा पायंडा सभासद शेतकऱ्यांनी जपला आहे.

स्व.राजेंनी लोकप्रिय कामापेक्षा लोकहिताच्या कामांना नेहमीच प्राधान्य दिले. त्यासाठी व्यक्तिगत नुकसानसुद्धा सोसले. आज सर्वत्र विविध राजकीय आरक्षण व महापुरुषांच्या पुतळ्यावरून राळ उठताना दिसते. मात्र त्यांनी कागल शहरात कोणतेही आरक्षण नसताना मागासवर्गीय समाजातील शिवाजीराव गाडेकर यांना नगराध्यक्षपदाचा मान दिला होता. त्यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे गावकुसाबाहेर बसविण्यात येत होते. मात्र त्यांनी तो कागलच्या मध्यवर्ती ऐतिहासिक गैबी चौकात बसवला होता.

सीए सारख्या उच्च शिक्षणानंतर चिरंजीव समरजितसिंह घाटगे यांनी आपला जन्म ज्या राजघराण्यात झाला आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला समाजात मान-सन्मान मिळत आहे.त्यांची सेवा करुन ऋण फेडावे.यासाठी त्यांनी समाजकारणात यावे. अशी त्यांची विचारधारा होती.समाजसेवेचे बाळकडू रक्तातच असलेल्या समरजितसिंह यांनी व्यवसायाऐवजी समाजसेवेचा मार्ग निवडला.स्व विक्रमसिंहराजे एक व्यक्ती नसून सुसंस्कृत विचारधारा आहे. त्यामुळे देहाने जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या व्यापक समाजहिताच्या विचारातून ते आपल्यातच आहेत. हाआदर्श समोर ठेवून ते शाहू ग्रूपची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, दीन -दलित बहुजन समाजाच्या व्यापक हिताचे कार्य आपल्या हातून करणे हीच त्यांना श्रद्धांजली आहे. अशा उदात्त भावनेतून ते कामकाज करीत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी जीवापाड जपलेला विचारांचा वारसा कृतीतून सक्षमपणे पुढे नेत आहेत. शाहू ग्रुपमधील सर्वच संस्था त्या- त्या क्षेत्रात भक्कम व आदर्श आहेत.अशा संस्थाना समाजाने पाठबळ देणे व त्यांची संरक्षण करणे हीच खऱ्या अर्थाने स्व विक्रमसिंह घाटगे यांना श्रद्धांजली ठरेल. छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याला साजेसे स्वर्गीय राजेसाहेब यांना अपेक्षित समाजकार्य ते मोठ्या धडाडीने करीत आहेत. विशेषता आरोग्य सेवेच्या बाबतीत नागरिकांना मोठी मदत होत आहे. कोल्हापूर संस्थांनमध्ये बहुजनांना मोफत शिक्षणाचा कायदा करणाऱ्या शाहू महाराजांना शैक्षणिक उपक्रमातूनही त्यांनी कृतीतून अभिवादन केले आहे. कागल मतदारसंघातील शाळांमध्ये ई लर्निंग सुविधा, आदर्श शिक्षक पुरस्कार शिष्यवृत्ती सराव परीक्षा, चित्रकला स्पर्धा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, राजे अकॅडमी, शिक्षण संकुल, प्रबोधनपर व्याख्याने, गुणगौरव अशा विविध शैक्षणिक उपक्रमातून
कोल्हापूर संस्थांनमध्ये बहुजनांना मोफत शिक्षणाचा कायदा करणाऱ्या शाहू महाराजांना शैक्षणिक उपक्रमातूनही त्यांनी कृतीतून अभिवादन केले आहे.
एकंदरीतच स्व.घाटगे यांच्या जीवनावर एक दृष्टीक्षेप टाकला तर आभाळाएवढे विशाल मनाच्या व सुपाएवढ्या काळजाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्यातील हा वारस नातू समाजाशी एकरूप झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा समाजहिताचा संस्कार जोपासण्यासाठी आपला देह चंदनाप्रमाणे झिजविणाऱ्या व आपले उभे आयुष्य कापराच्या वडीप्रमाणे समाजासाठी समर्पित करणाऱ्या अशा या अजातशत्रू व्यक्तिमत्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

विक्रमसिंहराजेंनी शेतकऱ्यांना श्रीमंत केले

शाहू महाराज यांनी राधानगरी धरणाच्या उभारणीतून कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढला.तर विविध साधनसामग्री देऊन कृषी उत्पन्नासाठी चालना दिली होती.अगदी त्याच धर्तीवर स्व.घाटगे यांनी काळम्मावाडी धरणाच्या पूर्ततेनंतर शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून उपसा जलसिंचन योजना राबवल्या व दूधगंगेच्या मुशीतील पाणी पंचगंगेच्या कुशीत डोंगर कपारी वर खेळवले आणि दऱ्याखोऱ्यात ऊसाचे मळे फुलवले. शाहू कारखान्यामार्फत विविध विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. शेतकऱ्यांना खते-बियाणे, औषधे, अवजारे पुरवून उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले. आणि उच्चांकी ऊसदराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना श्रीमंत केले. हाच जलनीतीचा समृद्ध वारसा चालविताना समरजितसिंह घाटगे यांनी वीस वर्षे रखडलेल्या आंबेओहोळ प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी 227.54 कोटी रुपयांचा भरीव निधीची उपलब्धता, चिकोत्रा धरण भरण्यासाठी म्हातारीच्या पठारावर बांध घालण्याचा उपक्रम, साठवण तलाव,बंधारे,पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना, ठिबक सिंचन साठी प्रोत्साहन अशा विविध माध्यमातून चालविला आहे.

 

वारस शाहूंचे

स्व.घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शाहू साखर कारखान्याने उच्चांकी ऊस दराची परंपरा निर्माण केली. या उच्चांकी ऊस दराबद्दल शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उभारलेले डिजिटल फलकांची कांही समाजकंटकांकडून मोडतोड केली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांत व्यवहार बंद ठेवणे, मोर्चा काढणे बाबत चर्चा सुरू झाली. मात्र या कार्यकर्त्यांना त्यांनी स्पष्टपणे सुनावले की त्यांनी आपले डिजिटल फलक फाडले आहेत. आपले चांगले काम तर आहे तसेच आहे.चांगले काम करून प्रत्यक्ष कृतीतूनच त्यांना उत्तर देऊ या. असे म्हणून या प्रकरणावर पडदा टाकला. यानिमित्ताने जर त्यांनीही संतप्त भूमिका घेतली असती तर कागल तालुक्यामध्ये वनवा पेटला असता व सर्वसामान्यांचे हाल होऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असते. हा विचार करूनच त्यांनी अतिशय संयमाने ही परिस्थिती हाताळली. कागलमध्ये ओबीसी समाजास रद्द झालेले राजकीय आरक्षण न्यायालयाने कायम केल्यावर राजे समरजितसिंह घाटगेंच्या अभिनंदनपर फलक कागलमध्ये गैबी चौकात फाडले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कोणताही उद्रेक न होता शांततेची आवाहन केले. राजकीय सामाजिक जीवनात विरोधकांकडून पातळी सोडून होत असलेल्या टीकेला त्यांनी स्वतःची पातळी न सोडता आदर्श कामातून उत्तर देण्याचा वारसा जपला.

काळम्मावाडीच्या पाण्याचा राखणदार

काळमावाडी धरणातील पाणी गैबी बोगद्यातून कोल्हापूरला देण्याच्या निर्णयाला स्व.राजे साहेब यांचा विरोध होता. प्रसंगी या न्याय हक्कासाठी रस्त्यावर बसले.कारण हे पाणी दूधगंगा नदी काठावरील लोकांच्या हक्काचे पाणी होते. शेवटी हे पाणी थेट पाईपलाईनने कोल्हापूरला नेण्याचा निर्णय झाला. काळम्मावाडी धरणातील हे पाणी कोल्हापूरला वळवले तर भविष्यात दूधगंगा काठच्या लोकांना पाणी कमी पडेल ही भीती स्व. राजे साहेबांनी 35 वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती. गतवर्षी धरणातील कमी साठ्यामुळे दूधगंगा पात्र कोरडे पडले.आज दूधगंगा नदीवरून सुळकुड येथून इचलकरंजी शहराला पुरवठा योजनाला विरोध होत आहे. याचाच अर्थ 35 वर्षांपूर्वीचे त्याचे बोल आजा खरे ठरत आहे.ते ख-या अर्थाने काळम्मावाडी धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याचे राखणदार होते.त्यांचाच वारसा राजे समरजितसिंह घाटगे त्यांचे पश्चात चालवीत आहेत.

1979 साली स्व.राजेंना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली होती. आमदार असलेले राजे त्यावेळी सहज निवडून आले असते. मात्र नियोजित शाहू साखर कारखान्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी हे तिकीट नाकारत असल्याचे नम्रपणे वरिष्ठांना कळविले व त्यानंतर दुसऱ्यावर्षी दुसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक लढवून ते विजयी झाले व शाहू साखर कारखान्याची यशस्वीपणे उभारणीही केली. उमेदवारीसाठी रात्रीत पक्ष बदलणाऱ्या दलबदलू राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे त्यांचे उदाहरण आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!