अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे नियोजन करावे…. आमदार सतेज पाटील यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the news

अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे नियोजन करावे…. आमदार सतेज पाटील यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार व नामदार एच. के. पाटील यांची भेट घेतली. महापुराची परिस्थिती उदभवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी मागणी केली.

या चर्चेदरम्यान आमदार पाटील यांनी सांगितले कि, कोल्हापूर परिसरात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपलीकडे गेली आहे. आजवरचा अनुभव लक्षात घेता अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग आणि धरणातील पाणीसाठा याचा पंचगंगेच्या पुरावर प्रभाव पडतो. १९ जून, २०२१ रोजीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या समन्वय समितीच्या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे अलमट्टी धरणातील पाणीसाठा हा त्यावर्षीच्या १५ ऑगस्ट पर्यंत ५१७ मीटर एवढा ठेवण्याचे ठरले आहे. पण सध्या हा पाणीसाठा ५१७ मीटर पेक्षा अधिक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पाणीसाठा याचे योग्य नियोजन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली. कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही परस्पर सहकार्याने काम करत आहोत, असे आ.पाटील यांनी सांगितले.

याला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार डी.के. शिवकुमार जी यांनी अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!