विशाळगड भेट ही महाविकास आघाडी, सतेज पाटील यांचा ढोंगीपणा
यांचा पाठिंबा नेमका कोणाला?
खासदार धनंजय महाडिक यांचा सवाल
कोल्हापूर विशाळगडला महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील आणि इतरांनी दिलेली भेट निव्वळ ढोंगीपणा आहे, त्यांच्याकडून सुरू असलेले हे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे आहे असा आरोप करतानाच आघाडीच्या नेत्यांचा पाठिंबा नेमका कोणाला आहे? असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार बैठकीत केला.
खासदार महाडिक म्हणाले, माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या काळात अतिक्रमणे का निघाली नाहीत. तेव्हा ते गप्प बसले. आता मात्र, विशाळगडावर जाऊन नाटकी प्रेम दाखवत आहेत. हे त्यांचे ढोंगी प्रेम आहे. अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने आहेत की हटाव मोहिमेच्या बाजूने हे त्यांनी स्पष्ट करावे. अतिक्रमण हटवण्याची मागणी करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ते अतिरेकी म्हणतात. हा हा आरोप तर
अतिशय गंभीर आहे.
जी दंगल झाली ती निश्चितच समर्थनीय नसल्याचे सांगून महाडिक म्हणाले, सध्या या प्रकरणावरून महाविकास आघाडी राजकारण करू पाहत आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. तो रोखला गेला पाहिजे. या प्रकरणी आता एम आय एम चे नेते कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. तो योग्य आहे. कोल्हापुरातील प्रश्न सोडवायला कोल्हापूरकर समर्थ आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कृष्णराज महाडिक भाजपकडून इच्छुक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.