Spread the news

*केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार*

*जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम*

*दहा हजार वृक्ष लावण्याची घातली अट*

*कोल्हापूर, दि. १५;*
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच कोल्हापुरात येणार आहेत. सीपीआर इमारतीचे भूमिपूजन व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल बारामती येथे झालेल्या जनसन्मान मेळाव्यात जाहीररीत्या ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी आपण केंद्रीय मंत्री श्री शहा यांना भेटल्याचे सांगितले या भेटीत त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले. तसेच; वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात दहा हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करा, असा निरोप देण्यासही सांगितले. जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत भूमिपूजन व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विस्तारीत नूतन इमारत या दोन इमारतींच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा येणार असल्याचे जाहीर केले होते. काल बारामती येथे झालेल्या जनसन्मान मेळाव्यामध्ये दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भाचा उल्लेख केला.

*सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल…..!*
कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन होणार आहे. या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार आहे.
============


Spread the news

You may also like

error: Content is protected !!