*केडीसीसी बँकेत मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजनेची खाती झिरो बॅलन्सवर*
*जिल्हा बँकेची अभिनव योजना*
*मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांची माहिती*
*झिरो बॅलन्स सुविधेची राज्यातील पहिली बँक*
*कोल्हापूर, दि. ८:*
*कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजनेसाठी झिरो बॅलन्सवर खाती उघडून घेण्यास सुरुवात केली आहे. खास या योजनेसाठी माता-भगिनींसाठी ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय बँकेने घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बँकेचे अध्यक्ष नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभिनव योजना सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. झिरो बॅलन्स सुविधेची राज्यातील पहिली बँक आहे.*
*याबाबत बँकेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकेत नवीन खाते केवळ शून्य बाकीवर उघडण्याची अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. घोषित योजनेचा लाभ मिळण्यासाठी नवीन खाते उघडण्याची सुविधा बँकेत उपलब्ध करून देण्यात येत आहे. बँक शासनाच्या विविध योजनांची उदाहरणार्थ: संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजना, स्कालरशीप, अंगणवाडी महिला या सारख्या योजनेचे अनुदानाचे वाटप करीत आहे. तसेच; लेक लाडकी योजनाही बँकेने प्रभावीपणे राबवली असून त्यास वांगला प्रतिसाद मिळाला आहे. तरी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीणं योजनेची रक्कम जमा होण्यासाठी जिल्हा बँकेतील कोणत्याही शाखेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्ये देखील सरकारच्या योजनेतील रक्कम जमा करून लाभ घेता येईल. या खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि जीवन सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल. जिल्हा बँकेच्या १९१ शाखा कार्यरत असून कार्यालयीन वेळेत महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी झिरो बाकीवर खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील पहिली बँक ठरल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.*
*दरम्यान; अधिक माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी पत्रकात केले आहे.*
==========