विशाळगडला १३ जुलैला जाणार, अतिक्रमणमुक्त करणार संभाजीराजे आक्रमक, पोलिसांना घाबरणार नाही

Spread the news

विशाळगडला १३ जुलैला जाणार, अतिक्रमणमुक्त करणार

संभाजीराजे आक्रमक, पोलिसांना घाबरणार नाही

कोल्हापूर

विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा यासाठी अनेकदा मागणी केली, पण प्रशासन ते गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. आता मात्र येत्या 13 जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगडला जाणारच, तेथे काय करणार हे आता नाही, त्याच दिवशी कळेल असा इशाराच माजी खासदार संभाजीराजे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिला. आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल तर आम्ही घाबरणार नाही, आता शिवभक्तांना हे सरकार थांबवू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

संभाजीराजे यांनी सांगितले की, विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा यासाठी आमचा लढा सुरू आहे. सरकारला अनेकदा याबाबत निवेदने दिली, चर्चा केली. गांभीर्याने घेण्याबाबत विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा केली. पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. आता आम्हाला बघायचे आहे, मुख्यमंत्री काय करणार ते ?

संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन कसे पुढे जायला पाहिजे ही आज वेळ आली आहे. विशाळगडाला खूप मोठा इतिहास आहे. त्यामुळे मी विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण, पशु हत्या केली जाते हे ऐकून होतो पण दीड वर्षांपूर्वी मी विशाळगडावर गेलो. तेथे गेल्यानंतर आणि सगळी दृश्य पाहिल्यावर मला खूप दुःख झालं.

मी तत्काळ जिल्हाधिकारी यांना भेटलो आणि जे अतिक्रमण झालं ते हटवण्याची मागणी केली.

ते म्हणाले, अतिक्रमण दोन्ही बाजूने झालं आहे, आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही.

कत्तलखाना बंद व्हावा अशी आम्ही मागणी केली. महाशिवरात्रीच्या आधी सगळे अतिक्रमण काढू असे आश्वासन दिले आणि काम चालू केले. पण तातडीने त्याला कोर्टात जाऊन स्थगिती देण्यात आली. त्यामुळे अतिक्रमण काढणे बंद झाले. पण अतिक्रमणमुक्तीची ही चळवळ पुन्हा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूने झालेलं अतिक्रमण काढावे अशी माझी मागणी आहे. दीड वर्षांपूर्वी स्थगिती आल्यानंतर सरकारने काय केलं याचं उत्तर सरकारला द्यावेच लागेल.त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही, कुठंतरी भूमिका घेतलीच पाहिजे. ती भूमिका आम्ही घेतली आहे. तेरा जुलैला आम्ही तेथे जाणार हे नक्की आहे. आता शिवभक्तांना हे सरकार थांबवू शकत नाही.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!