कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीत आपत्ती नियंत्रण कक्ष जागतिक बँकेचा प्रकल्प, अत्याधुनिक यंत्रणा, मुंबईनंतर प्रथमच दक्षिण महाराष्ट्रात प्रकल्प

Spread the news

कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीत आपत्ती नियंत्रण कक्ष

जागतिक बँकेचा प्रकल्प, अत्याधुनिक यंत्रणा, मुंबईनंतर प्रथमच दक्षिण महाराष्ट्रात प्रकल्प

 

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

पस्तीस वर्षात चार वेळा आलेल्या महापुराने दक्षिण महाराष्ट्रात प्रचंड हानी झाली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली व इचलकरंजीत अत्याधुनिक आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.  जागतिक बँकेच्या सहकार्याने करण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सहाशे कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. मुंबईनंतर प्रथमच राज्यात असा प्रकल्प राबविण्यात येणार असून वर्षभरात त्याचे काम पूर्ण होणार आहे.

 

दक्षिण महाराष्ट्रात १९८९, २००५, २०१९ व २०२१ या सालात मोठा महापूर आला. कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगलीला याचा मोठा दणका बसला.  भविष्य काळात महापूर येऊ नये आणि आलाच तर कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने व मित्रा संस्थेच्या माध्यमातून मोठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून२२०० कोटींचा निधी मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून९६० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्याचा आराखडा तयार आहे. त्याला मंजूरीही देण्यात आली आहे.

कोल्हापुरात मित्रा संस्थेच्या वतीने शाश्वत विकास परिषद घेण्यात आली. त्यामध्ये या प्रकल्पावर चर्चा झाली. याचाच एक भाग म्ह्णून तातडीने अत्याधुनिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा कक्ष सध्या राज्यात केवळ मुंबईत आहे. त्या पाठोपाठ आता कोल्हापूर, सांगली व इचलकरंजीत तसा कक्ष सुरू करण्यात येणार आहे.  यासाठी तब्बल सहाशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.  सध्या प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहेत, पण त्यांच्याकडे फारशा सुविधा नाहीत. त्यामुळे महापुराच्या काळात मर्यादा येतात. याच पार्श्वभूमीवर आता नवीन कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षात आधुनिक जीपीएस यंत्रणा, संवाद यंत्रणा याशिवाय आधुनिक साधने असणार आहेत. यामुळे महापुरापासून कमीत कमी नुकसान होण्यास मदत होणार आहे.

 

 

कोट

दक्षिण महाराष्ट्रातील तीन शहरात होणारे हे आधुनिक नियंत्रण कक्ष पुढील वर्षी जुलै महिन्यात सुरू करण्यात येईल. त्याचा आराखडा तयार आहे. त्यादृष्टीने कामाला सुरूवात करण्यात आली आहे. मुंबईनंतर राज्यातील हे आधुनिक कक्ष असतील.

विजयशेखर कळवकोंडा, विशेष प्रकल्प अधिकारी, जागतिक बँक

 

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!