तेंव्हा मला कार्यसाफल्याचा आनंद मिळतो ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांचे प्रतिपादन

Spread the news

‘तेंव्हा मला कार्यसाफल्याचा आनंद मिळतो
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांचे प्रतिपादन

 

कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगमध्ये शिकून पोलीस उप अधीक्षक पदाला गवसणी घालणारा सरदार नाळे यांच्यासारखा माझा विद्यार्थी राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख ‘माझा राजा ‘ असा करतो, तेंव्हा मला कार्यसाफल्याचा आनंद मिळतो ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी येथे बोलताना केले.
शाहू छत्रपती फौंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा शाहू स्मारक भवनात झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ पवार बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष एम बी शेख, लाचलुचपतविरोधी पथकाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ अजित लोकरे चंद्रकांत कांडेकरी डी डी पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा शाहू स्मारक भवनात झाला.
यावेळी बोलताना डॉ पवार म्हणाले,’ शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या प्रिन्स शिवाजी मराठी बोर्डिंग मध्ये शिकून सरदार नाळे पोलीस उप अधीक्षक झाले. आपल्या यशाचे श्रेय शाहू महाराजांना देताना ते राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख आदराने ‘ माझा राजा ‘ असा करतात, तेंव्हा माझ्यासारख्या शाहू विचारक शिक्षकाला कार्यसाफल्याचा खरा आनंद मिळतो.’
यावेळी बोलताना लाचलुचपतविरोधी पथकाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांनी आज शाहू महाराजांच्या उदार शैक्षणिक धोरणामुळे आणि त्यांनी उभारलेल्या बोर्डिंग मुळेच आपल्यासारख्या अल्प भूधारक शेतकऱ्याचा मुलगा वरिष्ठ पोलीस अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकल्याचे आवर्जून नमूद केले, म्हणूनच शाहू राजा मला ‘माझा राजा ‘ वाटतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ अजित लोकरे यांनी शाहू महाराजांच्या अभ्यासकांसाठी डॉ जयसिंगराव पवार हे दिपस्तंभ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी डॉ प्रशांत जमने, दैनिक “सकाळ ‘चे प्रतिनिधी संतोष मिठारी, सौ रुपाली शहा, दीनानाथ कदम, प्रा अरविंद मानकर, आजम जमादार, गौतम हिरेमठ यांना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन, तर सौ संज्योती समुद्रे, सौ मीनाज कुरणे, विजय जाधव, सौ उर्मिला तेली, भाऊसो बोराटे, सौ पूनम पाटील, सौ माधुरी देसाई, सौ जयश्री बुवा, सौ प्रियांका शेळके, मानसिंग दड्डीकर, सौ मानसी भोसले, माणिक कागवाडे आणि सौ शुभ्रा झरेकर यांना राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक डी डी पाटील, न्युजशाही न्युज नेटवर्कचे निवासी संपादक नवाब शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा जॉर्ज क्रुज यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सचिव जावेद मुल्ला यांनी संस्थेच्या तेरा वर्षातील वाटचालीची माहिती दिली. डी डी पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले. संयोजन नवाब शेख, चंद्रकांत कांडेकरी, जावेद मुल्ला, फरीद शेख, आदींनी केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!