राजर्षी ” शाहूं” ची जन्मभूमी असलेल्या “कागल” ची शाहूंचे कागल अशी ओळख देशभर करणार ….
राजे समरजितसिंह घाटगे
राधानगरी धरणस्थळी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती भर पावसात हजारो शाहू भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी.
राधानगरी / प्रतिनिधी
” बहुजन समाजाला छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. राधानगरी धरण उभारणीच्या माध्यमातून त्यांनी हरितक्रांती फुलविली. मात्र शाहूंच्या “कागल” ची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख गेल्या पंचवीस वर्षांपासून कांही मंडळींनी हेतुपुरस्सर निर्माण केली आहे. आजही छत्रपती शाहूंच्या नावाने व्हाट्सॲप, गूगूल,विकिपीडियावर
सर्च केल्यास आपणास शाहूंच्या कर्तुत्वाऐवजी केवळ येथील आरोप,प्रत्यारोप निदर्शनास येतात ही दुर्दैवी बाब आहे. कागल आणि शाहू महाराज हे समीकरणच जनतेला कळू दिले नाही.अशी खंत व्यक्त करून राजर्षि शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारस म्हणून येत्या काळात राजर्षी ” शाहूं” ची जन्मभूमी असलेल्या कागलची ओळख शाहूंचे कागल अशी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्ह्याचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
घाटगे पुढे म्हणाले, राधानगरी धरणस्थळ हे आमच्यासाठी ऊर्जास्थळ आणि प्रेरणास्थळ आहे .पाच वर्षांपुर्वीपासून आम्ही शाहू जयंती राधानगरी धरणस्थळी साजरी करत आहोत.या ठिकाणचे पर्यटन वाढावे व या पर्यटनाच्या माध्यमातून शाहूंच्या कर्मभूमीची ओळख सर्वदूर व्हावी, जयंती साजरी करण्यामागे आमची भूमिका हीच आहे.त्यामुळे येत्या काळात आपण स्थानिक भुमिपुत्र आणि शाहू महाराजांचे नातेसंबंध दृढ करण्यासाठी प्राधान्य देणार आहोत.
यावेळी धरणातील जलपूजन करून वाद्यांच्या गजरात बारा बलुतेदारांच्या सोबत त्यांनी जलकलश जयंतीस्थळापर्यंत आणले. त्यांच्यासह राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे व राधानगरी परिसरातील बारा बलुतेदार जोडप्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास विधीवत जलाभिषेक घातला. छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे व शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांनी केले.हजारो शाहूभक्तांच्या गर्दीच्या साक्षीने उत्साही वातावरणात हा जयंती सोहळा साजरा झाला. यावेळी निगवेतील पथकाच्या मर्दानी खेळाच्या चित्र थरारक प्रात्यक्षिकानी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अकरा लाभार्थ्यांना जातीचे दाखल्याचे वाटप घाटगे यांच्या हस्ते केले.
यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजे बँकेचे चेअरमन एम.पी .पाटील, राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगुले,बिद्रीचे माजी व्हा. चेअरमन बाबासाहेब पाटील, भगवानराव काटे, दत्तामामा खराडे, कारखान्याचे सर्व संचालक, शाहू ग्रुपचे पदाधिकारी, कागल राधानगरी येथील शाहू प्रेमी, महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक संभाजी आरडे यांनी केले तर आभार विलास रणदिवे यांनी मानले….
*पुढच्या जयंतीला आमदारकीचा गुलाल घेऊनच येणार.*
सालाबाद प्रमाणे पुढच्या वर्षी ही राधानगरी मध्ये शाहू जयंती साठी येणार आहे.त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन आमदारकीचा गुलाल घेऊनच येणार. मात्र हा गुलाल तमाम जनतेच्या त्यागाचा समर्पणाचा कष्टाचा असेल. यामध्ये कागलकरांच्या बरोबरीने राधानगरीकरांचेही योगदान असेल. हा गुलाल केवळ माझ्या विजयाचा नसेल तर तमाम जनतेच्या विजयाचा असेल.असे प्रतिपादन यावेळी घाटगे यांनी केले.