*एक पेड मां के नाम, या मोहिमेचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कोल्हापुरात शुभारंभ*
कोल्हापूर
पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या आता आपण अनुभवत आहोत. ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न संपूर्ण जगासमोर निर्माण झाला आहे. अशावेळी वृक्षारोपण आणि झाडांचे जतन- संवर्धन हा एकमेव शाश्वत उपाय आहे. नेमक्या याच भावनेतून, भारतीय जनता पार्टीच्या वतीने, एक पेड- मा के नाम, हे अभियान संपूर्ण देशभर राबवले जाणार आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याने किमान एक तरी झाड आपल्या जन्मदात्री आईच्या नावाने लावावे आणि ते झाड वाढवावे, अशी ही संकल्पना आहे. या मोहिमेचा नुकताच कोल्हापुरात शुभारंभ झाला. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून, कोल्हापुरात एक पेड मा के नाम या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. देशातील प्रत्येक नागरिकांनी आता वृक्षारोपण करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी आणि लावलेल्या रोपट्याचे जतन संवर्धन करून पृथ्वीवरील हिरवळीचे क्षेत्र वाढवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कोणीही नागरिक भाजपच्या या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवले, तर नक्कीच पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले जाईल. त्यामुळे या मोहिमेत कोल्हापूरकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापुरातील कार्यालय परिसरात खासदार महाडिक यांनी स्वतः आपल्या मातोश्रींच्या नावे वृक्षारोपण केले आणि प्रत्येकाने झाड लावण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री भरमु पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, संग्राम कुपेकर, रूपाराणी निकम, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, डॉक्टर सदानंद राजवर्धन उपस्थित होते.