जागा लाखावर..सीईटी दिली ५५ हजार विद्यार्थ्यांनी
राज्यातील बीबीए, बीसीए च्या जागा राहणार रिक्त, संस्थाचालक अस्वस्थ
कोल्हापूर
बीबीए, बीसीए, बीबीएम यासह काही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीइटी घेण्याचा निर्णय एप्रिलमध्ये झाला, मे महिन्यात परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांपर्यंत माहितीच न पोहोचल्याने केवळ ५५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, एक लाख जागा असताना परीक्षेलाच प्रतिसाद न मिळाल्याने निम्यापेक्षा अधिक जागा रिक्त राहणार आहेत. यामुळे राज्यातील सुमारे दीड हजार कॉलेजचे प्राचार्य व संस्थाचालक अस्वस्थ झाले आहेत.
राज्यात यापूर्वी बीसीए अभ्यासक्रमाला सीईटी शिवाय प्रवेश दिला जात होता. यंदा बीबीए, बीसीए आणि बीबीएम अभ्यासक्रमासाठी सीईटी घेण्याचा राज्य सरकारने घेतला. राज्यातील बहुतांशी महाविद्यालयांना या अभ्यासक्रमाला एआयसीटीई कडून मान्यता मिळाली आहे. यामुळे प्रवेशासाठी एप्रिलमध्ये सीईटी घेण्याचा निर्णय झाला. तातडीने मे महिन्यात परीक्षा घेण्यात आली. त्याला फार प्रतिसाद मिळाला नाही. पण, सध्या आम्ही सीईटी दिली नाही, पण अभ्यासक्रमाला प्रवेश द्या म्ह्णून विद्यार्थी संस्थाचालकांना विनंती करत आहेत. पण, ते शक्य नसल्याने अडचणी येत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अभिमत विद्यापीठात थेट प्रवेश होत असताना राज्यात अचानक घेतलेल्या सीईटी परीक्षेमुळे अनेकांना प्रवेशापासून दूर रहावे लागत आहे.
याबाबत मार्ग काढावा यासाठी शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पुन्हा सीइटी घ्यावी, विना सीईटी प्रवेश द्यावा अथवा सीईटी घेण्याचे अधिकार राज्यातील सर्व विद्यापीठांना द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाटील यांनी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष क्रांतीकुमार पाटील, प्राचार्य व्ही.एम. पाटील, प्राचार्य डी.आर. मोरे, प्राचार्य प्रविण चौगले यांच्यासह अनेक संस्थाचालक उपस्थित होते.