डिजिटल फलक, डॉल्बी लावल्यास वर्षभरासाठी पाणी कनेक्शन रद्द, पाच हजाराने वाढणार घरफाळा
माणगाव ग्रामपंचायतीचा नवा निर्णय, फटाके वाजविण्यासही बंदी
कोल्हापूर
रस्त्यावर, चौकात डिजिटल फलक लावला, डॉल्बी वाजला, वाढदिवसाला रात्री फटाके वाजवला तर एक वर्षासाठी पाणी कनेक्शन रद्द करण्याबरोबरच घरफाळ्यात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला आहे. विधवाना सन्मान, आईवडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना संपतीत वारसा हक्क नाकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर या गावाने आणखी एक नवे पाऊल या निमित्ताने टाकले आहे.
माणगाव गावाने आजपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याची अमंलबजावणीही सुरू आहे. विधवा महिलेस एक दिवस सरपंच होण्याचा, तिच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा मान दिला. आईवडिलांची काळजी न घेतल्यास मुलांच्या वारसा हक्क नोंद न करण्याचाही निर्णय घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या ग्रामसभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये डिजिटल फलक, डॉल्बी, फटाके यासह विविध निर्णयांचा समावेश आहे.
दहा दिवसापूर्वी मोबाइलवरील स्टेटसवरुन दोन समाजात वादावादी झाली. गावातील शांतता व सलोख्याला धक्का पोहोचला. या प्रकाराची गंभीर दखल ग्रामपंचायतीने घेतली. त्यातूनच विविध निर्णय घेण्यात आले. सामाजिक सलोखा व शांतता निर्माण होण्यासाठी कडक निर्बंध, सर्वधर्मिय शांतता कमिटीची स्थापना, गावामध्ये धार्मिक-सामाजिक-राजकीय कार्यक्रम व वाढदिवसानिमित्त डिजीटल बोर्डवर बंदी घालण्याचा ठरावही करण्यात आला. तसेच गावामध्ये डॉल्बी लावणे, पुंगळया काढून गाडया पळविणे यावर बंदी घालण्याचा निर्णय झाला. सार्वजनिक रस्त्यावर रात्री-अपरात्री वाढदिवस करुन फटाके वाजविण्यावर बंदी घालण्यात आली. रात्रीच्या वेळी सार्वजनिक रस्त्यावर खेळ खेळण्यास बंदी आणली.
धार्मिक तेढ निर्माण होईल असे स्टेटस व मेसेज व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर लावल्यास व त्या पाठविल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायतीतर्फे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय ग्रामसभेने मान्य केला. गावांत शांतता अबाधित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर अथवा वैयक्तिक चौकामध्ये धार्मिक झेंडे लावल्यास त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करुन शांतता भंग केल्याचा गुन्हे दाखल करण्याचा ठराव मंजूर झाला. या निर्णयांचा कोणी भंग केल्यास संबंधितांचे खासगी नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे.
कोट
गावात शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी डॉल्बी बंदीसह डिजिटल फलकाला विरोध करण्यात आला आहे. ग्रामसभेत घेतलेले निर्णय सर्वांना बंधनकारक आहेत. याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
राजू मगदूम, सरपंच