*जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
कोल्हापूर:
देशाच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे व दातृत्वात सदैव अग्रेसर राहिलेला जैन समाज हा परंपरेने आमच्या पाठीशी राहिलेला समाज आहे.
जैन समाजाच्या विकासासाठी हे सरकार नेहमीच कटिबद्ध राहील. “अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाने” केलेल्या मागणी अनुसार जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचा निर्णय सरकार घेईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “जैन जागृती अभियान” या विशेष कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की जैन समाजाच्या साधुसंतांच्या रक्षणासाठी, जैन मंदिर, जैन तीर्थांच्या रक्षणासाठी व जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक स्वतंत्र जैन महामंडळ स्थापन व्हावे ही काळाची गरज आहे आणि जैन अल्पसंख्याक महासंघा ची मागणी मान्य करत महाराष्ट्र राज्यामध्ये जैन विकास महामंडळ लवकरच स्थापन करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील जैन समाजातील व्यापारी, उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे सरकार असून राज्यात विकासाच्या योजना साठी सरकार कधीही मागे हटणार नाही. व्यापारी- उद्योजकांना कोणतीही अडचण आल्यास तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करू शकता.
नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले की कोल्हापूरच्या विकासातही जैन समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे व महायुती सरकार नेहमीच जैन समाजाच्या पाठीशी आहे व यापुढेही असेल.
जैन समाजाचे राष्ट्रीय अधक्ष ललित गांधी यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात, जैन अल्पसंख्यांक महासंघाने गेल्या दहा वर्षात केलेला कामाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी व्यापारी व उद्योजकांसाठी घेतलेल्या विविध कल्याणकारी निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. जैन समाजाचे पवित्र तीर्थ सम्मेद शिखरजी, पालीताना, गिरणारजी नाकोडाजी या तीर्थक्षेत्रावरील समस्या सोडवण्यासाठी सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल, त्याचबरोबर संभाजीनगर येथील कीर्तीस्तंभ हटवण्याचा निर्णय रद्द केल्याबद्दल आणि जैन साधुसंतांना त्यांच्या विहारांमध्ये पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश काढल्याबद्दल राज्य व केंद्र सरकारला धन्यवाद दिले.
*या प्रसंगी ललित गांधी यांनी जैन समाजातील कर्जफेड करणाऱ्या १६००० अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने निर्देश दिले जातील व प्रत्येक शेतकऱ्याला हे अनुदान मिळेल याची ग्वाही दिली.*
जैन महासंघाने मागणी केलेल्या जैन विकास आयोग महामंडळ च्या स्थापनेस पाठिंबा दिलेल्या राज्यातील 160 आमदार व 28 खासदारांच्या शिफारस पत्रासह तयार केलेला प्रस्ताव ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला
अलीकडच्या काळात जैन समाजावर होत असलेल्या वेगवेगळ्या आघात व साधुसंतांच्या रक्षणासाठी जैन समाजात आज एक सशक्त संघटनेची आवश्यकता आहे व त्या अनुषंगानेच अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात “राष्ट्रीय जैन सेने”ची स्थापना महावीर जन्म कल्याणक च्या पवित्र दिवशी करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रीय जैन सेनेचे राष्ट्रीय उपप्रमुख संदीप भंडारी यांनी यावेळी दिली. तसेच राष्ट्रीय जैन सेना ही अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच: या तत्त्वाने काम करेल व जिथे ही गरज पडेल तिथे ‘राष्ट्रीय जैन सेना’ चे जैन सैनिक वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून जैन समाजाच्या मान व सन्मानाची रक्षा करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही असे या वेळेस संदीप भंडारी यांनी सांगितले.
याप्रसंगी संभवनाथ जैन ट्रस्ट गुजरीचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, लक्ष्मीपुरी जैन ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, भक्ती पूजा नगर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र ओसवाल, महावीर नगर जैन संघ चे अध्यक्ष जवाहर गांधी, शत्रुंजय संघ ट्रस्ट चे अध्यक्ष अमृत शहा, प्रशम ओसवाल, हिम्मत ओसवाल, महेंद्र ओसवाल, विकास अच्छा, प्रीती पाटील, अमित वोरा, प्रितेश कर्नावट, मेघ गांधी, प्रीतम बोरा, राजेश ओसवाल
इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.