एमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही,
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्पष्टीकरण
विषयाचे भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न
कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात एमआयएम सारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही, त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, या विषयाचे भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे, शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित असल्यानेच असे प्रकार विरोधक करत आहेत मात्र अशा प्रचाराला कोल्हापूरची सुज्ञ जनता फसणार नाही असे पत्रक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
एमआयएम ने शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार व सहसंपर्कप्रमुख विजय देवणे व आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवाजी महाराज व रा. शाहू महाराजांचे विचार लोकसभेत जाणार याची खात्री असल्यानेच प्रचंड प्रमाणात समाजातील लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत आहे. या निवडणुकीत अनेक संघटना, पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. परंतु कोल्हापूरसाठी भूमिका घेताना आपआपल्या पक्षाची देशातील, राज्यातील भूमिका बाजूला ठेवून शाहू छत्रपती बिनशर्त पाठिंबा देत आहेत. या पार्श्वभूमीवर २१ एप्रिल रोजी एमआयएमच खासदार इम्तीयाज जलिल यांनी शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. तो निर्णय जाहीर करताना खासदार जलिल यांनी पत्रकार बैठकीत सांगितले होते की, मी माझ्या कोल्हापूरच्या टिमला शाहू महाराजांना समर्थन देण्यास सांगितले आहे. शाहू महाराजांनी मला फोन केला नाही, त्यांनी माझ्याकडे समर्थन मागितले नाही, परंतु सर्वच राजकीय पक्ष रा. शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित राजकारण करतात, महाराज कोण आहेत? त्यांचे समाजातील स्थान काय आहे हे आम्हाला माहीत आहे,म्हणूनच मी ओवेसींना सांगितले की, शाहू महाराजांसारख्या चांगल्या उमेदवारांना मदत करण्याची आपली भूमिका असली पाहिजे म्हणून आम्ही शाहू महाराजांना मागणी केली नसतानाही स्वताहून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभा मतदार संघात एमआयएम सारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही, त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, या विषयाचे भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे, शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित असल्यानेच असे प्रकार विरोधक करत आहेत मात्र अशा प्रचाराला कोल्हापूरची सुज्ञ जनता फसणार नाही असेही या पत्रकात म्हटले आहे.