एकदाच लढणार ,निवडून येणार, मोदींना मतदान करणार प्रकाश आवाडे यांची घोषणा

Spread the news

एकदाच लढणार ,निवडून येणार, मोदींना मतदान करणार प्रकाश आवाडे यांची घोषणा

 

कोल्हापूर, प्रतिनिधी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी आघाडीच्या वतीने मैदानात उतरण्याची घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपली ही उमेदवारी असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. आपली ही बंडखोरी नसून भाजपनेही मला उमेदवारी भरायला सांगितले नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आवडे यांचे सुपुत्र राहुल यांनी प्रयत्न केला. पण उमेदवारी खासदार धैर्यशील माने यांना मिळाली. तेव्हापासून आवडे काय करणार याची उत्सुकता होती. राहुल आवाडे यांनीच आपल्या वडिलांच्या उमेदवारीची घोषणा करत पडदा पाडला.

कोल्हापुरात झालेल्या पत्रकार बैठकीत आमदार आवाडे म्हणाले, हातकणंगले मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी मैदानात उतरत आहे. आता एकदाच लढणार आणि जिंकणारही. खासदार कसा काम करू शकतो हे दाखवणारच. निवडून आल्यानंतर मोदी यांना आपण पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपण भाजपकडे उमेदवारी मागितली नव्हती, राहुल लढावा अशी इच्छा होती. त्याला निवडून आणतो अशी ग्वाही मी भाजपला दिली होती. मात्र, उमेदवारी मिळाली नाही. आता ताराराणी आघाडीच्या वतीने आपण मैदानात उतरणार आणि निवडून येणार असेही त्यांनी सांगितले. आवाडे यांच्या या भूमिकेमुळे हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. महायुतीचे धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील, वंचित विकास आघाडीचे डी.सी. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि आता ताराराणी आघाडीचे आवाडे मैदानात उतरले आहेत.

महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे यामुळे महायुतीला याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्यानेच आवाडे यांना उमेदवार म्हणून भाजपने पुढे आणल्याची चर्चा आहे कारण आवडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत आपली ही बंडखोरी नाही असे ते म्हणत आहेत याचा अर्थ भाजपचा त्यांना आशीर्वाद असल्याचे स्पष्ट होते आवाडे यांचीही उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटा यांच्या शिवसेनेला धक्का देणारी ठरणार आहे

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!