आता त्यांच्यासाठी मी कसा प्रतिगामी
संजय मंडलिक यांचा सवाल
कोल्हापूर, प्रतिनिधी
आत्तापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो, तेव्हा पुरोगामी होतो आणि आत्ता अचानक त्यांच्यासाठी प्रतिगामी कसा झालो? असा सवाल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केला.
खासदार मंडलिक यांच्या कोल्हापुरातील प्रचार कारल्याचे उद्घाटन मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. आपल्याला उमेदवारी नको म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांचा राजकीय बळी दिल्याचा आरोप त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, समरजीत सिंह घाटगे, चंद्रदीप नरके, राहुल चिकोडे, माणिक पाटील, प्रा. जयंत पाटील, उत्तम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंडलिक म्हणाले, शाहू महाराजांच्या कामासाठी प्रत्येक तालुक्यात कार्यालय काढणार असल्याचे कळाले. म्हणजे त्या अजिंक्यताराच्या शाखा असणार आहेत. त्यांना खासदारकी, आमदारकी, गोकुळ अध्यक्ष हे सगळे आपल्या घरात नोकर पाहिजेत. त्यांनी माझ्यावर टीका करताना विचार करावा.
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नेत्यात फूट पाडून सतेज पाटील यांना आपले राजकारण करायचे आहे. जेवढी दुकाने जास्त तेवढा आपला फायदा असे त्याला वाटते. दरम्यान व्यक्तिगत टीका टाळण्याचे आवाहन हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले.
बोरवडे येथे झालेल्या मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफ यांनी मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या निवडणुकीत कोणा व्यक्ती विरोधात आपली लढाई नसून महायुतिविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई आहे. काही जणांचे डमी उमेदवार म्हणून शाहू महाराजांना निवडणूक लढवायला भाग पाडणाऱ्यांचा निवडणुकीत उघड होणार आहे. या मेळाव्याच्या
अध्यस्थानी बिद्रीचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे होते. यावेळी भैय्या माने, सुनील राज सूर्यवंशी, दिनकर कोतेकर, अण्णासाहेब पवार, बाळासाहेब फराकटे यांची भाषणे झाली.