समतेसाठी शाहू महाराजांना लोकसभेत पाठवूया
सतेज पाटील यांचे आवाहन,
- काँग्रेस सोबत काम करण्याचा अप्पी पाटील यांचा निर्णय जाहीर
चंदगड तालुक्यातून 50 हजाराचे मताधिक्य देण्याचा निर्धार
अप्पी आले, आता सुट्टी नाही
कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज रा .शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि लोकशाही धोक्यात आली असताना समतेचा, बंधुत्वाचा विचार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने संसदेत पाठवूया असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. दरम्यान, केडीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्यामुळे चंदगड तालुक्यात महाविकास आघाडीला मोठी ताकद मिळाल्याने आता सुट्टी नाही असेही ते म्हणाले.
चंदगड विधानसभा मतदार संघातील नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी शुक्रवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारों कार्यकर्त्यांच्या समवेत राष्ट्रीय काँग्रेस सोबत काम करण्याचा निर्णय जाहीर केला. चंदगड तालुक्यातून शाहू महाराजांना 50 हजाराचे मताधिक्य देण्याचा निर्धारही यावेळी सर्वांनी व्यक्त केला. कसबा बावड्यातील श्रीराम सेवा संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातील सुमारे 200 चारचाकी गाड्यांच्या ताफ्यानं आलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसने चांगल्या विचारांचा, बंधुभावाचा, एकमेकांना मदत करण्याचा पाया रचला. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये धर्मांधर्मात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भाजपाने केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारावर चालणाऱ्या या देशात एक वेगळं वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे विचार पुसण्याचे काम भाजप करत आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी नथुराम गोडसे यांचे पूजन केले जाते. या संघर्षाच्या काळात तुम्ही-आम्ही एकत्र यायला हवे. यासाठीच एक आशेचा, समाजातील बंधुभावनेचा, समतेचा विचार, लोकशाहीचा आवाज श्रीमंत शाहू महाराजांच्या रूपाने दिल्लीमध्ये पोहोचवुया असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलताना माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, अप्पी पाटील यांच्या पाठिंब्यांने आम्हाला खूप मोठी ताकद मिळाली आहे. एखादा नेता किती मोठ्या मनाचा असतो हे अप्पी पाटलांच्या रूपानं आम्हाला समजलं. कोणताही उमेदवार हा सर्वसामान्य माणसाला देव मानून त्याचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्याच्या घरापर्यंत जात असतो, मात्र अप्पी पाटील जनतेलाच घेऊन राजेना पाठिंबा देण्यासाठी इकडे आले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याने त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत.
यावेळी अप्पी पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण मी खूप जवळून पाहिले. आज संपूर्ण महाराष्ट्रात सतेज पाटील यांच्या रुपाने उमदं नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना आता पायदळी तुडवण्याचं, संविधान संपवण्याचा काम हे भाजप सरकार करत आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा समतेचा विचाराची आता संसदेत गरज आहे. संसदेत अशा प्रकारची व्यक्ती गेली तर देश वाचणार आहे.
यावेळी गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोड साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ पाटील, गौतम कांबळे,माजी नगरसेवक फिरोज सौदागर, सोमगोंड आरबोळे यांनी मनोगतं व्यक्त केली.
यावेळी गोड साखर कारखान्याचे माजी संचालक संभाजी नाईक, महागावचे सरपंच प्रशांत शिंदे, राजू खमनेकट्टी,शिर्षण पाटील, विजय नाईक, विजयराव पाटील, सोमगोंडा आरबोळे, राजू खमलेट्टी, प्रशांत शिंदे, संभाजी नाईक, दयानंद पट्टणकोटी, सोमनाथ पाटील, भरमा केसरकर, अर्जुन दिवटे, भीमराव पट्टणकोटी, गौतम कांबळे, शैल पाटील, भुजंग नाईक, फिरोज सोलापूरे, संदीप कोकितकर, महम्मद पठाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
चौकट
अप्पी आले, आता सुट्टी नाही
आता अप्पी पाटील आमच्या बरोबर आले आहेत. आता सुट्टी नाही. त्यांना आम्ही व्हट्यात घेतलं आहे. त्यांना पुढं घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असे म्हणत आमदार पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना नवा विश्वास दिला. आता अप्पी आलेत, आता सुट्टी नाही या घोषणेने कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले. आता चंदगड मतदारसंघात 50 हजारपेक्षा जास्त मताचं मताधिक्य श्रीमंत शाहू महाराज यांना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चौकट –
चंदगड वर माझे विशेष प्रेम आहे. चंदगड तालुक्यात ऊस, काजू याचं पीक मोठं आहे. शिक्षण संस्था चांगल्या प्रकारे वाढवूया. चंदगड विधानसभा मतदार हा केंद्रबिंदू ठेवून आगामी काळात विकास करण्याची भूमिका घेऊ,असा विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.