हातकणंगलेतून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डी.सी. पाटील यांची उमेदवारी
पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
जैन समाजाच्या मतावर डोळा ठेवून वंचित ने साधला डाव
दोन एप्रिल रोजी घोषणा होण्याची शक्यता
कोल्हापूर ,प्रतिनिधी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी.सी. पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या नावाची घोषणा दोन एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. वंचित विकास आघाडी प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी महासंघा बरोबर आघाडी करणार आहे. या आघाडीच्या वतीने राज्यातील लोकसभेच्या अनेक जागा लढवण्यात येणार आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी आणि महायुतीचे धैर्यशील माने यांची लढत निश्चित झाली आहे. माने यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे ते शेट्टी यांना लढत चांगली लढत देतील अशी शक्यता असतानाच आता वंचित ने डी.सी. पाटील यांना मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे.
या मतदारसंघात जैन समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. शेट्टी यांना ही मते अधिक प्रमाणात मिळतात. त्यांच्या मतांची विभागणी करण्यासाठीच पाटील यांचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. स्वच्छ प्रतिमा म्हणून पाटील या मतदारसंघात परिचित आहेत. वंचितने येथे उमेदवारी दिल्यास त्याचा फटका कोणाला बसेल याबाबत उत्सुकता आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवाराने तब्बल सव्वा लाख मते घेतली. यामुळे शेट्टी यांच्या पराभवाला हे मोठे कारण ठरले. आता पाटील मैदानात उतरले तर त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होणार याबाबत उलट सुलट चर्चेला वेग आला आहे.
पाटील यांनी चार दिवसांपूर्वी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतुनच त्यांची उमेदवारी निश्चित झाली. याबाबतची फक्त अधिकृत घोषणा शिल्लक आहे.