महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकच!
मंगळवारी होणार घोषणा
कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून प्रा. संजय मंडलिक यांच्या नावाची मंगळवारी घोषणा करण्यात येणार आहे. यामुळे गेले काही दिवस असलेली संभ्रमावस्था दूर होणार आहे.
उमेदवारी घोषणा निश्चित झाल्याने मंडलिक गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे प्रचारालाही वेग आला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची घोषणा झाली. ते काँग्रेसच्या चिन्हावर मैदानात उतरतील हे स्पष्ट झाले आणि प्रचाराला सुरुवात झाली. दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारीबाबत संभ्रमावस्था होती. ती आता दूर झाली आहे. खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असून त्याची अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात येणार असल्याचे समजते. मंडलिक यांनीही यास दुजोरा दिला असून संभ्रमावस्था दूर झाल्यामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंडलिक हे धनुष्यबाण चिन्हावरच लढण्याची शक्यता असून कमळ चिन्हावर लढण्याबाबतचा प्रस्तावही चर्चेत असल्याचे समजते. मंडलिक यांच्या सोबत महायुतीच्या नेत्यांची फौज असून सर्वांनी त्यांना विजयी करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांना दिला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अनेकांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मंडलिक यांना उमेदवारी द्यावी, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मंडलिक यांचीच उमेदवारी निश्चित झाली.
महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या तेरा खासदारांची नावे उमेदवारीसाठी दिल्लीला भाजपकडे पाठवण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसात शिंदे गटात आणि महायुतीत इनकमिंग वाढले आहे. यामुळे आणखी कोणी आल्यास त्यांची सोय कुठे करायची याबाबत चर्चा सुरू असल्याने उमेदवारीची घोषणा दोन दिवस लांबणीवर पडली आहे.
मंगळवारी महाराष्ट्रातील महायुतीच्या अनेक उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामध्ये मंडलिक यांचा समावेश आहे.
खासदार मंडलिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपली उमेदवारी निश्चित झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता तो पाळण्यात येणार असल्यामुळे मंगळवारी उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. संघर्ष हा आमच्या घराण्याचा स्वभावच आहे. याच संघर्षातून आपण विजयापर्यंत निश्चित पोहोचू असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.