- संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीकडून तीन लाख शेणीदान
शेणीदान उपक्रमाचे श्रीमंत शाहू महाराज यांनी केले कौतुक
कोल्हापूर
संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका स्मशानभूमीस तीन लाख शेणीदान करण्यात आल्या . फुलेवाडी रिंग रोड नवीन वाशी नाका परिसरात झालेल्या कार्यक्रमात श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले, संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीने शेणीदान उपक्रमात २०१७ पासून सातत्य ठेवले आहे. सामाजिक कामात सातत्य आवश्यक असते हे काम या मंडळांनी केले आहे त्यामुळे ते इतरांना निश्चितपणे प्रेरणादायी आहे.
गेल्या सात वर्षात १५ लाख शेणीदान केल्याबद्दल समितीचे त्यांनी कौतुक केले.
आमदार ऋतुराज पाटील यांनी उत्सव समितीच्या सामाजिक कार्याबद्दल अभिनंदन केले. चार दिवसापूर्वी गरीब वॉचमनची झोपडी जळून खाक झाल्यानंतर उत्सव समितीने वाॅचमनचे कुटुंब पुन्हा उभारावे यासाठी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त संतोष पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, दुर्वास कदम, दिग्विजय मगदूम उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष गणपतराव मुळीक, विजय आवटे, धनंजय भोंगाळे, रवींद्र भवड, उन्मेश जेरे, राम पाटील, उत्तम निगडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.