- वंचित बहुजन आघाडीने दिला शाहू महाराजांना पाठिंबा…
प्रकाश आंबेडकर यांनी केली घोषणा
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची घोषणा आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली. यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात महाविकास आघाडी बरोबर वंचित यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण, त्यामध्ये अजूनही यश आले नाही. मात्र, कोल्हापुरात शाहू महाराज यांची काँग्रेसच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आंबेडकर यांनी घेतला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने कोल्हापुरात 70 हजारावर तर हातकणंगले मतदारसंघात सव्वा लाखावर मते घेतली होती. वंचित आघाडीची या मतदारसंघात मतांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीला त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
राज्यात आघाडी होण्यापूर्वीच वंचित ने सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या जागेचा समावेश आहे.