शाहू महाराज निश्चितपणे विजयी होतील पी एन पाटील यांचा विश्वास

Spread the news

शाहू महाराज निश्चितपणे विजयी होतील पी एन पाटील यांचा विश्वास

 

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर शुक्रवारी काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांनी त्यांची भेट घेतली. नवीन राजवाडा येथे शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार पी एन पाटील यांनी, “शाहू महाराजांच्याविषयी लोकांच्या मनात प्रेम आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणतीही कसल्या प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज विजयी होतील.”अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आमदार पी एन पाटील, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, भोगावतीचे चेअरमन शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समिती सभापती भारत पाटील भुयेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार पी एन पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी मध्ये समाविष्ट सर्वच मित्र पक्षांनी शाहू महाराजांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांच्यासह मित्र पक्षांचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात आहेत. शिवाय कोल्हापूर मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तीन आमदार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होईल. श्रीमंत शाहू महाराज यांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम आहे त्यामुळे या निवडणुकीत कोणतीही अडचण जाणवत नाही.”याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी एच पाटील, करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील शिंगणापूरकर, भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे, शिवाजी कारंडे, सुनील खराडे, ए.डी. चौगुले, अभिजीत रवी पाटील, कृष्णात धोत्रे, रणजीत पाटील आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!