शाहू महाराजांच्या प्रचारार्थ संभाजीराजे मैदानात
कोल्हापूर :
महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ त्यांचे सुपूत्र माजी खासदार संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरले आहेत. चंदगड, गडहिंग्लज अशा तालुक्यात प्रचाराची आणि गाठीभेटीची पहिली फेरी झाल्यानंतर ते आता राधानगरी तालुक्यात प्रचार करत आहेत.
संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेच्यावतीने लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र, महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज आखाड्यात उतरणार हे निश्चित झाले. त्यानंतर संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली. स्वराज्य संघटना राज्यात कोणत्याही मतदार संघात लढणार नाही असे सांगतानाच आपण महाराजांच्या प्रचारार्थ ताकदीने उतरणार असल्याची घोषणा केली.
या आठवड्यात महाराजांची अधिकृत उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या प्रचाराचे नियोजन सुरू झाले आहे. यामध्ये संभाजीराजे आणि माजी आमदार मालोजीराजे दोघेही सक्रीय झाले आहेत. संभाजीराजे यांनी तर गेल्या आठवड्यात चंदगड , आजरा, गडहिंग्लज तालुक्यात दौरा केला. या तालुक्यात त्यांचा संपर्क चांगला आहे. तेथे त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. महाराजांना विजयी करण्याचे आवाहन करतानाच प्रचार यंत्रणा कशी राबविता येईल याबाबत सूचना दिल्या.
सध्या ते राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, पी डी धुंदरे, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, राजू मोरे, शेकापचे संजय डकरे, बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, भोगावती कारखान्याचे संचालक ए. डी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष उत्तम पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी संबंधित गटाच्या उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाहू छत्रपती महाराज यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.
दरम्यान, कसबा तारळे येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित राहून संभाजीराजे यांनी सर्व कार्यकर्त्यांना शाहू महाराजांना लोकसभेत विजयी करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, हिंदुराव चौगुले, संजयसिंह पाटील, मधुकर रामाने, फत्तेसिंह सावंत, प्रवीण ढोणे, संजय पोवार आदी उपस्थित होते.