*मंडलिकांना उमेदवारी की बंडखोरी*
कोल्हापूर/ प्रतिनिधी
खासदार संजय मंडलिक यांना महायुतीची उमेदवारी मिळणार की त्यांना डावलल्यास बंडखोरी होणार याची आता जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे. उमेदवारी मिळणारच असा त्यांचा एकीकडे दावा सुरू असतानाच न मिळाल्यास बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या चिन्हावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे. फक्त त्याची अधिकृत घोषणा शिल्लक आहे. दुसरीकडे महायुतीची उमेदवारी मात्र निश्चित होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मंडलिक यांची उमेदवारी कापली जाणार अशी चर्चा सुरू असतानाच आपल्यालाच तिकीट मिळणार असा विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रचाराचा
नारळही फोडला आहे. कोल्हापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी दबावाचे राजकारण ही सुरू केले आहे. आपल्याला तिकीट मिळणार असल्याने कुणीतरी खोडसाळपणा करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. यामुळे तिकीट न मिळाल्यास ते बंडखोरी करणार की अन्य कोणता निर्णय घेणार याबाबत राजकीय उत्सुकता आहे. त्यांच्या ऐवजी सध्या समरजीत घाटगे यांचे नाव भाजपच्या वतीने पुढे केले जात आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, सध्या तरी उमेदवारी मंडलिक यांनाच मिळेल असा विश्वास आहे. वरिष्ठांनी काही वेगळा निर्णय घेतलाच तर ते बंडखोरी करणार नाहीत असाही विश्वास वाटतो. कारण ते सामंजस्य नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्याची पारख व जाण आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. बंडखोरी होऊ नये यासाठी आमचे निश्चितपणे प्रयत्न राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.
मंडलिकांच्या मनातील कुजका मेंदू कोण?
आपली उमेदवारी निश्चित असताना ती कापली जात असल्याचे वातावरण निर्माण करणारा कुजका मेंदू आपल्याला माहित आहे, निवडणुकीनंतर त्याचा समाचार घेऊ असा टोला मंडलिक यांनी मारल्यानंतर त्यांचा बाण नेमका कोणावर आहे, याबाबत जिल्ह्यात उलट सुलट चर्चेला वेग आला आहे. हा नेता कोणत्या पक्षाचा, जिल्ह्यातला की राज्यातला याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे अनेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याचे चित्र आहे.