हातकणंगलेची जागा लढवणार शिवसेना ठाकरे गट
कोल्हापूर /प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अजूनही आपला निर्णय न कळवल्याने अखेर महाविकास आघाडीच्या वतीने हातकणंगले मतदारसंघात शिवसेना मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यानिमित्ताने आघाडीच्या नेत्यांची बैठक घेऊन रणनीती आखण्यात आली.
हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याबाबत गेले वर्षभर चर्चा सुरू आहे. या निमित्ताने शेट्टी यांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. आघाडीच्या जागावाटपात ही जागा ठाकरे गटाला मिळाली आहे. यामुळे ठाकरे गट या जागेवर लढणार की स्वाभिमानीला जागा सोडणार हे दोन-तीन दिवसात निश्चित होणार आहे.
सांगलीची जागा सोडायला काँग्रेस तयार नाही. ती जागा तुम्ही घ्या असे म्हणत कोल्हापूरची जागा काँग्रेसने पदरात पाडून घेतली. मात्र, सांगलीचे स्थानिक नेते या निर्णयाला विरोध करत सांगलीची जागा आम्हालाच हवी असा आग्रह धरत आहेत. त्यासाठी माजी मंत्री विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे दिल्ली पातळीवर प्रयत्न करत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर सांगलीची जागा काँग्रेसला गेल्यास हातकणंगलेची जागा शिवसेनेला मिळेल आणि त्या जागेवर त्यांना लढावे लागेल. तशी वेळ आली तर तयारी असावी यासाठी महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली. उमेदवार म्हणून माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील यासह काही नावावर चर्चाही झाली. मात्र कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, संजय पवार, गणपतराव पाटील, सुजित मिणचेकर, वैभव उगले, संजय चौगुले, उल्हास पाटील, करण गायकवाड, अमर पाटील यांच्या सह अनेक नेते उपस्थित होते.