*50 एचपी वरील ट्रॅक्टरचे पासिंग करण्याचे आदेश परिवहन विभागाला द्यावेत – आमदार अमल महाडिक यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी*
भारत सरकारच्या मोटर वाहन अधिनियमानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने जून 2023 पासून भारत Term 3A मानक असलेली वाहने पासिंग करणे बंद केले आहे. हा नियम लागू केल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे 50 एचपी वरील ट्रॅक्टर पासिंग झालेले नाहीत. यामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ट्रॅक्टरचे पासिंग न झाल्यामुळे बँकेचा बोजा नोंद करणे, ऊस वाहतुकीसाठी साखर कारखान्यांबरोबर करार करणे थांबले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर धारक शेतकरी डीलरकडे तगादा लावत आहेत आणि प्रादेशिक परिवहन विभाग नियमाकडे बोट दाखवत आहे. ट्रॅक्टर डीलर असोसिएशनने कर्नाटक,आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये 50 एचपी वरील अशा प्रकारच्या ट्रॅक्टरचे पासिंग झाल्याची बाब परिवहन विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. तरीही या संदर्भात कोणतीही कार्यवाही होत नाही. या अनुषंगाने आमदार अमल महाडिक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन 50 एचपीवरील ट्रॅक्टरचे पासिंग करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना द्याव्यात अशी विनंती केली.
पासिंग बंद झाल्यामुळे ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान थकीत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालक चिंतित आहेत. या बाबीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी ही आमदार अमल महाडिक यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली.
या मागणीचे पत्र त्यांनी परिवहन मंत्र्यांना दिले.
शेतकरी आणि ट्रॅक्टर विक्रेत्यांना भेडसावणाऱ्या समस्येचा विचार करून लवकरच पासिंग संदर्भात निर्देश दिले जातील असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी दिला.
आगामी काळात 50 एचपी वरील ट्रॅक्टर च्या पासिंग चा मुद्दा निकाली निघेल आणि शेतकरी, ऊस वाहतूकदार, ट्रॅक्टर डीलर्स आणि वित्तीय संस्थांची अडचण दूर होईल असा विश्वास आमदार महाडिक यांनी व्यक्त केला.