डॉ.विवेक सावंत यांचे ‘कृत्रिम बुध्दिमत्तेची क्षितिजे आणि मानव’ या विषयावर 23 ला व्याख्यान
कोल्हापूर
महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे मुख्य मार्गदर्शक संगणकतज्ज्ञ डॉ.विवेक सावंत यांचे ‘कृत्रिम बुध्दिमत्तेची क्षितिजे आणि मानव’ या विषयावर व्याख्यान रविवार दि.23 जून रोजी सायं. 4.00 वाजता पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार विनोदकुमार लोहिया आहेत. या व्याख्यानाचे आयोजन डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समिती, कोल्हापूर यांनी केले आहे.
डॉ.विवेक सावंत हे MKCL चे चीफ मेंटॉर आहेत. 1995 मध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारमार्फत आयटी साक्षरता मोहीम सुरु केली जी आज MKCL आणि MS-CIT च्या रुपाने जगातील सर्वात मोठी आयटी साक्षरता चळवळ म्हणून ओळखली जाते. प्रचंड बुध्दिमत्ता, मुलभूत चिंतन आणि कामाचा सतत ध्यास असलेले डॉ. सावंत अनेक राज्य, राष्ट्रीय संस्थाचे सल्लागार सदस्य आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 11 एप्रिल 2024 रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला आहे. त्यांच्या सामाजिक, वाड्.मयीन, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा विचार करता त्यांचे अमृत महोत्सवी वर्ष वैचारिक मंथन आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. तरी सदर व्याख्यानास शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.जी.पी.माळी व सचिव विश्वास सुतार यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे केले आहे.