१७ माजी महापौर, २२८ माजी नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा निवडून आणण्याचा निर्धार

Spread the news

१७ माजी महापौर, २२८ माजी नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा

निवडून आणण्याचा निर्धार

हुकुमशाही कारभाराविरुध्द कोल्हापूरातून लढाई सुरू करण्याचा एल्गार

कोल्हापूर

लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपतींना कोल्हापूर शहरातील १७ माजी महापौर आणि २२८ माजी नगरसेवकांनी पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. देशातील हुकुमशाही कारभार परतावून लावण्याची लढाई कोल्हापूरातून सुरू झाली पाहिजे, असा एल्गारही माजी नगरसेवकांच्या बैठकीत करण्यात आला.

न्यू पॅलेस येथे झालेल्या माजी नगरसेवकांच्या मेळाव्याला काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक रामचंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी महापौर महादेवराव आडगुळे, रामभाऊ फाळके, आर.के. पोवार, कांचन कवाळे, भीमराव पोवार, मारुतराव कातवरे, सई खराडे, सागर चव्हाण, वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, प्रतिभा नाईकनवरे, वैशाली डकरे, अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, अॅड. सुरमंजिरी लाटकर, शोभा बोंद्रे, निलोफर आजरेकर यांच्यासह २२८ माजी नगरसेवकांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

लोकसभा निवडणूक प्रचाराला रंग चढू लागला असून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघडीने १७ माजी महापौर आणि २२८ माजी नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत सत्ताधारी महायुती आघाडीवर चांगलीच कुरघोडी केली आहे. माजी नगरसेवकांच्यावतीने बोलताना माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. इलेक्ट्रॉन बाँडमध्ये मोठा महाघोटाळा झाला आहे. एकीकडे जनतेचे महागाईने कंबरडे मोडले असून उद्योजकांच्या संपत्तीत वाढ होत चालली आहे. जाती, धर्मात भांडणे लावली जात आहेत. अशावेळी देश वाचवण्यासाठी सर्वांनी सिध्द झाले पाहिजे. देशातील हुकुमशाही कारभार परतावून लावण्याची लढाई कोल्हापूरातून झाली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

माजी महापौर आडगुळे म्हणाले, शाहू छत्रपती सर्वसामान्यांच्यात मिसळत असतात. लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतात. पण विरोधकांनी दत्तक प्रकरणावरुन अकलेचे तारे तोडले आहेत. भारतीय घटनेने दत्तक विधान कायद्याने एकादी व्यक्ती दत्तक आली तर मूळ घरांशी संबध संपूण जाते, ज्या घरात दत्तक येतात त्यांचे संबध सुरू होतात. याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्यांनी गद्दारी केली ते शाहू छत्रपतीवर घृणास्पद टीका करत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध केला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील म्हणाले, ज्यावेळी जिल्ह्यात शहरात आणि जिल्ह्यात संकट आले त्यावेळी शाहू छत्रपती धाऊन आले आहेत. आज देशातील परिस्थिती पाहता जात पात, पक्षभेद विसरुन शाहूंची उमेदवारी ही जनतेच्या रेट्याखाली झाली असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

आमदार सतेज पाटील म्हणाले, लोकसभेची निवडणूक खिलाडूवृत्तीने व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असताना विरोधकांकडून शाहू महाराजांचा सन्मान बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या वृत्तीला जनता चोख उत्तर देईल, असा इशारा दिला.

श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, कोल्हापूरातील माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. यापुढे कोल्हापूरच्या विकासासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचे असून कोल्हापूरच्या विकासातील कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे यासाठी नगरसेवकांचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे. नगरसेवकांनी भरपूर कामे केली असून त्यातील एकादे काम राहिले असेल तर त्याचा पाठपुरावा केला जाईल.

यावेळी माजी उपमहापौर प्रार्थना समर्थ, राजू लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील मोदी यांनी प्रास्ताविक केले.

 

….

शाहू छत्रपतींनी सांगितल्या नगरसेवकांच्या आठवणी

शाहू छत्रपतींनी माजी महापौर रामभाउ फाळके, महादेवराव आडगुळे, आर.के. पोवार, सई खराडे, निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर सुशीला उर्फ माई रेडेकर, विनायक फाळके यांच्या आठवणी काढल्या. तब्बल २८ वर्षानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या फाळके यांचे महाराजांनी स्वागत केले. कोल्हापूरच्या पाणीप्रश्नांवर फाळके यांनी राजीनामा दिला होता अशी आठवण सांगत त्यांचे काम सतेज पाटील यांनी पूर्ण केले असे सांगितले. आडगुळे यांच्या कारकीर्दीत कोल्हापूरात महापौर परिषद झाली होती. शिवाजी पेठेत भेटल्यानंतर सई खराडे यांनी राजीनामा न देता अडीच वर्षे महापौरावर कायम रहावे असा सल्ला मीच दिला होता असे महाराजांनी सांगितले. माजी उपमहापौर माई रेडेकर यांच्याजवळ जात त्यांची विचारपूस केली. फुटबॉलमधील भांडणे बंद झाली पाहिजेत, अशी सूचना विनायक फाळके यांना केली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!