बारा माजी महापौर आणि १०५ नगरसेवकांच्या सक्रीय पाठिंब्याने
मंडलिकांना कोल्हापूर शहरात मोठे मताधिक्य मिळणार
खासदार धनंजय महाडिक
विधानसभा निवडणूकीपूर्वी कोल्हापूर शहराला एक हजार कोटी विकासनिधी मिळणारः पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, ता.15 येथील बारा माजी महापौर आणि 105 माजी नगरसेवक यांचा पाठींबा आणि प्रचारातील सक्रीय सहभागामुळे कोल्हापूर शहरात संजय मंडलिकांना मोठे मताधिक्य निश्चित मिळेल. असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक केला. येथील माजी नगरसेवकांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. उमेदवार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सत्यजित उर्फ नाना कदम, प्रा. जयंत पाटील, आदिल फरास, आदि प्रमुख उपस्थितीत होते.
खासदार धनंजय महाडिक यांनी आगामी काळात केंद्र व राज्य सरकारने केलेली प्रचंड विकासात्मक कामे युवा-महिला वर्गासह समाजातील सर्व थरातील नागरिकांसाठी दिलेले भरीव योगदान याची माहिती घरोघरी पोहोचवावी असे आवाहन केले. तसेच विकास कामाचीच भली मोठी यादी असल्याने भावनिक मुद्द्याच्या पलीकडे जाऊन आपण नक्कीच बाजी मारणार आहोत असे ही त्यांनी नमूद केले .
पालकमंत्री हसनमुश्रीफ म्हणाले, शहराला लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर पण विधानसभा निवडणुकापूर्वीच एक हजार कोटी रुपयांचा विकासनिधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या सविस्तर चर्चेत मान्य केले आहे. यामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचे प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, यासह पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय, उपनगरे वसाहतीमधील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मोठी गती येणार आहे. त्यामुळे सर्व माजी नगरसेवकांनी झोकून देऊन प्रचारास लागावे. 105 नगरसेवकांच्या स्नेह मेळाव्यात झालेल्या निर्णयाने आता संजय मंडलिक यांच्या कोल्हापुर – महानगरातील प्रचारालाही मोठी आणि निर्णायक गती येणार असून कोपरा सभा, प्रचार फे-यांचे नियोजन करण्यात आले आहे.
संजय मंडलिक म्हणाले, मुंबई – पुण्यानंतर सर्वाधिक जीएसटी देणारे कोल्हापूर शहर औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यटन, आध्यात्मिक, वैद्यकीय क्षेत्रासह विविध पैलूनी विकसित होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने प्रयत्नशील राहू.