कोल्हापूर : एकाच छताखाली अत्याधुनिक उपचार करून आरोग्यसेवेत कोल्हापूरचा वेगळा ठसा उमटवलेल्या प्रेरणा हॉस्पिटल्सच्या ॲस्टर आधार हॉस्पिटल्सने येथील बालकल्याण संकुलास ३ लाख ७० हजारांची, तर याच रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उल्हास दामले यांनी १ लाख ३० हजारांची व्यक्तिगत मदत केली. या दोन्ही रकमेचे स्वतंत्र धनादेश बालकल्याणचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी डॉ. दामले, रुग्णालयाचे वैद्यकीय सेवाप्रमुख डॉ. अजय केणी, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. दलोन फर्नांडिस, वित्त अधिकारी रेश्मा माने, संकुलाचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मानद कार्यवाह पद्मजा तिवले उपस्थित होते.
बालकल्याण संकुलास ‘ॲस्टर आधार’ची अनेक पातळ्यांवर नेहमीच मोठी मदत होत आली आहे. संकुलातील शिशुगृहातील कोणत्याही बाळाचे कोणतेही आजारपण उद्भवले तर वर्षभर ॲस्टर आधारमध्ये या सर्व मुलांवर मोफत उपचार केले जातात. औषधेही उपलब्ध करून दिली जातात. त्याशिवाय संस्थेत येऊन मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. या रुग्णालयातील सर्व डॉक्टर व्यक्तिगत पातळीवर वर्षातून एकदा शक्यतो सप्टेंबरमध्ये किमान दोन ते अडीच लाखांची मदत संस्थेला करतात. अशा मदतीतूनच संस्थेतील मुलांचे भवितव्य चांगले घडत आहे.
——————
दामले यांचे दातृत्व
डॉ. उल्हास दामले यांचे संस्थेशी अकृत्रिम नाते आहे. संस्थेच्या सल्लागार मंडळातही ते आहेत. वर्षातून ते किमान पाच लाखांहून अधिकची रक्कम संस्थेला मदत म्हणून करतात. त्याची त्यांना आठवणही करून द्यावी लागत नाही.
———————
कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटल्सच्या वतीने तीन लाख ७० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश व्यवस्थापकीय संचालक डॉ. उल्हास दामले यांनी संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी पद्मजा तिवले, व्ही. बी. पाटील, डॉ. अजय केणी, डॉ. दलोन फर्नांडिस, रेश्मा माने उपस्थित होत्या.
—–